Saturday 18 April 2015

वाचनः एक आनंदनिधान

पुस्तकं म्हणजे परमानंदाचं ठिकाण. पुस्तकं म्हणजे शारदेचं भांडार. अस्सल ग्रंथप्रेमी, वाचक ग्रंथालयाला  अलीबाबाची गुहा म्हणतात. तर कोणी सॉलोमन राजाच्या खाणी म्हणतो. 

या ग्रंथांचे देणे l कल्पतरुहून उणे l
परिसापरीस अगाध देणे l चिंतामणी ठेंगणा ll

अशी ज्ञानदेवांच्या शब्दांची मधुकरी मागून आपण ग्रंथांची महती गातो. पुस्तकं आकाराने सारखी असली तरी प्रकृतीने वेगवेगळी असतात. काही ज्ञान देणारी, काही मनोरंजनाची, काही अनुभवांची. 
वाचन संस्कृती हा आपल्याला आपल्या माणसांकडून मिळालेला वारसा आहे. वाचन वेडाचे काही गुण हे आपल्याला काही अंशी जरी आपल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांकडून येत असले तरी वाचन वेडाची जोपासना जर योग्य व्यक्तीने केली तर त्या व्यक्तीच्या आचार विचारात कमालीचा फरक पडतो. असे जाणकारांचे मत आहे. येथे जाणकार म्हणजे वाचनवेडाने पछाडलेले असा होतो.
 वेदोत्तर कालात आपल्याकडे लेखनास सुरवात झालेली दिसते. यापूर्वी स्तोत्र किंवा काही धार्मिक साहित्य मुखोद्गत स्वरुपात होते. नंतर नंतर तेच वाड.मय लिखीत स्वरुपात आणले गेले.पण हे सगळं जास्त करुन धार्मिक स्वरुपाचेच जास्त होतं. पुढे लिहीण्याची साधनं आणि लेखन सराईतपणे सुरु झाल्यानंतर ग्रंथसंग्रह हा प्रकार अस्तित्वात आला. माणसाला ग्रंथांचे महत्व पटले आणि लगेच ग्रंथांचा संग्रह होणे हे ओघाने आलेच. लिपीचा विकास झाल्यावर सुरवातीला ताडपत्रे, भूर्जपत्रे, चामडे, लाकूड, गवत, धातूचे पत्रे, मातीच्या विटा आणि मग कागद अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ग्रंथ तयार होऊ लागले. सुरवातीला हे ग्रंथ खाजगी असत.
ग्रंथालयांविषयी अधिक जाणुन घेताना प्राचीन ग्रंथालय कोठे होते ते पाहू. जगातील अ्त्यंत प्राचीन ग्रंथालय इजिप्त मधील अलेक्झांड्रीया या शहरात स्थापन झाले होते. त्याकाळी या ग्रंथालयाचा ग्रंथसंग्रह उच्च दर्जाचा होता. पन्नास हजाराच्यावर असलेला हा संग्रह नंतर सात लाखावर गेला. इजिप्त बरोबरच हिंदुस्थान, ग्रीस वगैरे देशातील अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल ग्रंथ जतन करण्यात आले होते. पण मध्ययुगात ज्युलियस सीझर ने अलेक्झांड्रीया शहराचा पाडाव केला, त्यावेळी त्याच्या सैनिकांनी ग्रंथालयाच्या इमारतीला आग लावली. तेव्हा अर्धा ग्रंथसंग्रह जळून खाक झाला. नंतर धर्मयुद्धाच्या काळात धर्मवेड्या ख्रिस्ती सैनिकांनी देवालयाला आग लावली त्यात उरला सुरला ग्रंथ संग्रहही नष्ट झाला. 
संस्कृति संवर्धनाच्या दृष्टीने चीन मात्र प्रत्येक बाबतीत पुढे होता. कागद तयार करणे, छपाई यांचा शोध प्रथम चीननेच लावला आहे. युरोपियन राष्ट्रापेक्षा चीनने कित्येक शतकांपूर्वीच आघाडी मारली होती. इ.स. पूर्व 3000 या कालात चीन मधे पहिला ग्रंथसंग्रह तयार करण्यात आला होता. प्राचीन चिनी संस्कृतीचा संगतवार असा इतिहास आजही उपलब्ध आहे. त्यात ग्रंथालयाच्या महतीचा उल्लेख दिसतो.
आपल्याकडेही प्राचीन ग्रंथालयांची माहिती बुद्धकालापासूनच  आढळून येते. तक्षशिला, बनारस, विक्रमपुरी, नालंदा येथे बुद्धकालीन विद्यापीठांची तेथील ग्रंथसंग्रहाची बरीच माहिती आढळते. बनारस आणि पाटलीपुत्र या ठिकाणी पण अत्यंत महत्वाचे आणि प्राचीन ग्रंथसंग्रह होते. वेगवेगळ्या विद्यापीठातून अनेक आचार्य तक्षशीलेत येत. शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी त्यांच्याकडे सुंदर हस्तलिखीतं असत. हे झालं आपल्या प्राचीन ग्रंथालयाविषयी.
ग्रंथालय म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहू शकतं? हा प्रश्न अनेक जणांना विचारुन माझ्या असं लक्षात आलंय की ग्रंथालयाबद्दल जे जुजबी, प्राथमिक ज्ञान हे मुलांना शिशू वर्गापासूनच देण्याची गरज आहे. सांगायचंच झालं तर मुलांना ज्यावेळी अक्षर ओळखही नसते पण चित्रांच्या माध्यमातून ते शिकत असताना पुस्तक कसं वापरावं? कसं हाताळावं? इथपासून शिक्षण द्यायला हवं. मुलांना आपल्या शाळेच्या ग्रंथालयात मुक्त संचार करु द्यावा. याचा अर्थ नीट लावलेली पुस्तकं विस्कटवणे असा नाही. पुस्तके कशी चाळावीत? ती जागच्या जागी कशी ठेवावी याचे शिक्षण देता देता त्यांना पुस्तकात रमू द्यावे. अशाने त्यांना लहानपणापासूनच पुस्तकांविषयी गोडी वाटू लागेल. बालमंदिरातून मोठ्या शाळेत प्रवेश केल्यावर वाढत्या अभ्यासामुळे अवांतर वाचन मागे पडेल की काय असा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. पण यालाही एक उपाय आहे. मात्र यासाठी शिक्षकांना थोडी मेहनत घेणे गरजेचे आहे. विषय कुठलाही असला तरी त्याविषयाची प्राथमिक माहिती जर असेल तर तो विषय किंवा त्या विषयाचा पाया पक्का होण्यास मदत होते. म्हणून त्या त्या विषयाच्या अनुषंघाने विषयाचे वाचन मुलांना करावयास सांगावे. त्यामुळे कोणत्याही विषयाची गोडी लागण्यास मदत होते. 
इतर शास्राप्रमाणेच ग्रंथालयाचेही एक शास्र आहे. आपण जेव्हा औषधाच्या दुकानात (केमिस्ट) जातो तेव्हा आपल्याला सहजच लक्षात येतं की वेगवेगळया कंपनीची दुकानातली औषधं नीट आजारानुरूप एकत्र ठेवलेली असतात. यालाच वर्गीकरणानूसार ठेवलेली असतात असं म्हणतात. तसंच पुस्तकांबाबतही सांगता येईल. प्रत्येक पुस्तकाला एक विषय असतो. त्या त्या विषयाप्रमाणे एकाच विषयावरची पुस्तकं एकत्र ठेवली जातात. यासाठी सध्या तरी दोन पद्धती प्रचलित आहेत. एक म्हणजे मेलव्हिल ड्युई यांची दशांश वर्गीकरण (Decimal Classification) आणि रंगनाथन यांची द्विबिंदू वर्गीकरण (Colon Classification) 
उत्तम वाचक घडवणं हे जसं आई, वडील, शिक्षक यांचं काम आहे तसंच ग्रंथालयातील ग्रंथपालांचं पण काम आहे. एक ग्रंथपाल म्हणून काम करताना मला अगदी किशोर वयापासून ते मध्यमवयीन व्यक्तींना त्यांची आवड लक्षात घेऊन पुस्तकं सुचवायला लागतात. 

एकदा एक वाचक माझ्याकडे आला. म्हणाला ‘’ वयाच्या अठराव्या वर्षापासून काम करतोय. घरातली परिस्थिती बेताची असल्याने दहावी पर्यंतचंच शिक्षण घेऊ शकलो. नंतर आय टी आय चा कोर्स केला. गेली अडतीस वर्ष मशिन होऊन मशीनवर काम केलंय. आता मुलं शिकली. कामाला पण लागली. आता आयुष्यात निवांतपणा आलाय. पेपरशिवाय वाचलंच नाही कधी. आता मात्र वाचायचंय. मला पुस्तकं सुचवाल का वाचायला? देवानं मला आज सगळं काही दिलंय. सगळं ऐकून घेतल्यावर मी त्यांची आवड जाणून घ्यायच्या दृष्टीने विचारलं ‘’काका, काय वाचायला आवडेल? कथा, चरित्र, कादंबरी की ललित लेख? की धार्मिक प्रवचनं?’’ ते म्हणाले ‘’आमच्या लहानपणी बाबुराव अर्नाळकर हे नाव मी ऐकायचो मित्रांच्या तोंडून. त्यांची आहेत का पुस्तकं? मी म्हणाले हो. आहेत ना. थांबा देते. मग एक अर्नाळकारांची कादंबरी आणि ह. मो मराठेंचं ‘बालकांड’ दिलं. दोन्ही पुस्तकं आवडली म्हणाले. आणि जरा भावूक झाले. म्हणाले, ‘’ बालकांड वाचून मला माझं लहानपण आठवलं हो. हे वाचल्यावर मला असं वाटायला लागलंय की मी पण माझ्या आठवणी लिहून काढाव्यात.’’ तोच धागा पकडून मी म्हणाले, ‘’ अगदी अवश्य लिहा. तुम्ही केलेले कष्ट, श्रम हे तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीला कळायला हवेत. यामुळे आपण परत एकदा भूतकाळात रमतो. आपला वेळही चांगला जातो. मी तुम्हाला अजून काही चरित्र देते. ती तुम्ही वाचा. जसं आठवेल तसं लिहीत जा.’’ काका एकदम खूश झाले. म्हणाले ‘’हे छान सुचवलंत तुम्ही.’’ वाचनाने वेळ तर चांगला जातोच. पण लिहायची स्फूर्ती पण मिळते. 
गंगाजळी, उत्तम मध्यम, संकलन चे सुप्रसिद्ध लेखक श्री. श्री.बा. जोशी यांनी संकलन या लेखांच्या पुस्तकात म्हंटले आहे की ग्रंथ हे नेहमीच अपूर्ण समीकरण असते. ग्रंथाला वाचक मिळाला की त्याची पूर्णता होते. लेखक आणि वाचक असे दोन तट आहेत. ग्रंथ हे शून्यासारखे असतात. पण वाचक त्याच्यामागे उभा रहाताच त्या शून्याला मोल येते. आपले विचार, आपली प्रतिभा, आपले ज्ञान हाच कोणत्याही ग्रंथाचा जन्महेतू असतो. त्यांच्याच लेखातील आणखी एक किस्सा…इजिप्तच्या स्वारीत नेपोलिलयनने सोबत विद्वानांचा भला मोठा ताफा नेला होता. त्याने इजिप्त मधले ग्रंथ गाढवांवर वाहून नेले. व्यूहरचना करतेवेळी तो मिस्कीलपणे हुकूम सोडताना सांगे- ‘’ सभोवती सैन्यदल, मध्यभागी गाढवे आणि विद्वान मंडळी! का? तर त्यांच्या ज्ञानसाधनांचे संरक्षण व्हावे. अशा शाही संरक्षणामुळेच फ्रेंच साहित्यात शेकडो दुर्मिळ ग्रंथांची भर पडली. दुसर््या  महायुद्धात नेस्तनाबूत झालेले चिमुकले जपान आज जगात ‘वाचकांचा देश म्हणून ओळखला जातो. 

कोणताही हाडाचा वाचक आपल्या संग्रहातील पुस्तक कोणालाही देत नाही. आणि जर दिलंच तर ते पुस्तक परत येईपर्यंत नेणार्याकडे तगादा लावतोच. जर यदाकदाचित त्याच्याकडून पुस्तक हरवलेच तर तो वाचक पुस्तक हरवणार्याला आपल्या मित्रयादीतून कायमचे काढून टाकतो. असा माझ्यासमोर घडलेला अनुभव आहे. 
सुप्रसिद्ध कायदे पंडित सोली सोराबजी यांचा या बाबतीतला अनुभव बोलका आहे. ते म्हणतात, ‘’ मी माझ्या पुस्तकांवर खूप प्रेम करतो. माझ्या प्रत्येक ग्रंथाची जागा, आकार, सुगंध सगळं सगळं मला माहित आहे. माझी पुस्तकं मला दुसर्या कोणाला वाचायला द्यायला आवडत नाहीत. पुस्तकं वाचायला द्यायला मी नकार दिल्यामुळे मी बर्याच लोकांना दुखवलंय हे मला माहित आहे.’’
 हल्ली पूनर्विकासासाठी जाणार्या इमारतींमुळे ज्येष्ठ पिढी आपल्याकडचा ग्रंथसंग्रह ग्रंथालयाकडे हस्तांतरीत करताना दिसते. आपल्याकडचा ग्रंथसंग्रह ग्रंथालयात मोठ्या ममत्वाने सुपूर्द करताना ‘’आम्ही सगळी वाचून काढली हो ही पुस्तके. आता आमची मुलं नि त्यांची मुलं नाही हो वाचणार. त्यांना वाचनाची आवड नाहीये. आणि ते वाचतील फक्त इंग्रजी पुस्तकं. काही माहिती लागली तर तांदूळ निवडल्यासारखं मोबाईलवर बोटं फिरवत इंटरनेटवर बघतील. पुस्तकाच्या स्पर्शाची भाषा या मुलांना नाही समजणार. तुम्ही ही पुस्तकं तुमच्या ताब्यात घ्या. आणि या पुस्तकांना वाचक मिळेल असं पहा.’’ 
आपण एखाद्या असा ग्रंथालयात गेलो, जिथे सगळी पुस्तकं बंद कपाटात ठेवलेली आहेत. ग्रंथालयात वाचकांची ये जा नाही. एक भयाण शांतता आहे. अशा ग्रंथालयात जायला कोणाला आवडेल? ज्या ग्रंथालयात ग्रंथ बंद कपाटात न ठेवता वाचकांच्या सहज हाताला लागतील असे ठेवलेत, आणि वाचक मोठ्या समाधानाने पुस्तकं चाळत आहेत, बालवाचक त्यांच्या विभागात मन लाऊन पुस्तक वाचत आहेत.   अशा ग्रंथालयात वाचक आपोआप खेचला जातो. यामुळे ग्रंथालय शास्राचे दोन नियम, एक म्हणजे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळतो. आणि दुसरे म्हणजे प्रत्येक वाचकाला त्याचा आवडीचा ग्रंथ मिळतो याचे आपोआप पालन होते. हे झाले ग्रंथालया विषयी.
वाचनाच्या आवडी विषयी सुप्रसिद्ध लेखिका कै. शांताबाई शेळके यांनी एका लेखात म्हंटले आहे की माझ्या वाचनाला शिस्त नाही तसे माझ्या ग्रंथसंग्रहालाही पूर्वनियोजन नाही. काही वाचक चोखंदळ असतात. ते  एखादा विषय ठरवून निवडक वाचन करतात. केवळ व्हिटामिन्सच्या गोळ्यांवर जगावे, आणि फक्त पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्व असलेलाच आहार घ्यावा तसंच यांचं वाचन असतं. पण मला ते जमलंच नाही. पुस्तकांबाबतीत आणखी एक मन हेलावणारी गोष्ट त्या सांगतात. त्यांच्या ओळखीच्या एका बाईला पैशाची नड होती. म्हणून तिने शांताबाईंना तिच्याजवळ असलेले शब्दकोशाचे खंड विकत देऊ केले. म्हणाली ‘’जरा पैशाची नड आहे. साठ/ सत्तर रुपये दिलेत तरी चालतील. तेवढ्याने माझी नड भागेल.’’ पण शांताबाईंनाही इतक्या कमी किंमतीत खंड विकत घेणे रास्त वाटेना. त्याकाळी शांताबाईंकडेही तशी सुबत्ता नव्हती. पण तरीही त्यांनी ते खंड शंभर रुपयात विकत घेतले.
पुस्तकाचा खाजगी संग्रह करताना तो किती व्यवस्थित असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवयित्री कै वृंदा लिमये. तसा व्यवस्थितपणा इतरही क करत असतील. वृंदाताईच्या निधनानंतर त्यांचा खाजगी ग्रंथसंग्रह आमच्या ग्रंथालयात दाखल झाला. कै. वृंदा ताई लिमये यांनी त्यांच्या संग्रहातील माहितीपूर्ण पुस्तकांना कव्हर घालून त्या पुस्तकाचे जर वर्तमानपत्रात परिक्षण आले असेल तर त्याचे कात्रण त्याच पुस्तकात लाउन ठेवले होते. ज्यायोगे कधी जर अधिक संदर्भ लागलाच तर त्याचा वापर करणे सहज शक्य होते. 
ज्या वाचनाने वाचकाला सुख मिळते नि तो वाचत रहातो त्याला विष्णूशास्र्यांनी ‘विद्यासूख’ असा शब्द वापरला. तर वि.का राजवाड्यांनी ‘ग्रंथसुख’ म्हंटलं. रवींद्रनाथ टागोरांनी ‘ग्रंथबल’ म्हणून संबोधलं, तर काका कालेलकरांनी ‘वाचनयज्ञ’ असा शब्दप्रयोग केला. 
सध्याच्या धावपळीच्या युगात ‘वाचायला वेळ नाही’ असं जिकडे तिकडे ऐकू येत आहे. किंवा हळूहळू ई-बुकचा जमाना येऊ घातलाय. मंत्रयुगाकडून तंत्रयुगाकडे वाटचाल करत असताना काही बदल हे व्हायचेच. ग्रंथालय पूर्णपणे संगणकीकृत झाल्यास वाचकाला कोणत्याही पुस्तकाची त्वरीत माहिती उपलब्ध होऊ शकते. काही ग्रंथांना ‘शोध शब्द’ (Key Word) घातला की एकाच विषयाच्या सर्व पुस्तकांची यादी क्षणात  उपलब्ध होऊ शकते. 
लोकांना वाचनासाठी उद्युक्त करताना काही चांगली, वाचनीय पुस्तके सहज दृष्टीस पडतील अशी ठेवावीत. दर आठवड्याला नवीन आलेली पुस्तके शोकेस मध्ये वाचकांना चाळण्यासाठी ठेवावी. हल्ली फेसबुकचा, व्हॉट्स ऍप चा जमाना आहे. त्यावर नव्या पुस्तकांची यादी टाकावी. प्रसंगानुरुप ग्रंथ प्रदर्शने भरवावीत. उदा- मोठ्या सुट्यांच्या आधी (उन्हाळी सुट्टी, पावसाळी ट्रेक व इतर सुट्ट्या   )   बालवाचकांना वाचनाची गोडी लागण्यासाठी स्पर्धा आयोजित कराव्यात. वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन त्यानुसार पुस्तके मागवावित. या अशा उपायांनी वाचक वाचनालयाकडे नकळतपणे ओढला जाईल. काही जण हल्ली टॅबवर पुस्तके डाऊनलोड करुन वाचनभूक भागवतात.  आपला देश प्रगती पथावर असला तरी अजूनही कित्येक खेड्या पाड्यात इंटनेट सुविधा पोचलेली नाही. त्यामुळे ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही योजना अंमलात आणली पाहिजे. ग्रंथालयात काम करायचे झाल्यास आपण पूर्णपणे वाचकसेवा करणे या भावनेनेच काम केले तर आपल्याला आणि वाचकाला त्याचा आनंद पूर्णपणे उपभोगता येतो.
सरतेशेवटी एकच सांगायचं आहे की आपण काय वाचावे आणि कसे वाचावे याचा विचार आपला आपणच करावा. नाहीतर आपली अर्धी हयात हाच विचार करण्यात जाते. तसं तर सुचवायला ग्रंथपाल उपयोगी पडतात. पण ज्याने त्याने आपल्याला रुचेल अशीच पुस्तके वाचावीत. ज्या वेळी मानवाने अवकाशात प्रवेश केला त्यावेळी अमेरिकन असोसिएशनने वाचकांना एक नवी घोषणा दिली. – Explore Inner Space- Read. (अंतःकरणाचा वेध घ्या- वाचा.) म्हणूनच श्री. बां च्या मते ज्या वाचनाने अवर्णनीय अशा आनंदाची प्राप्ती होते ते वाचन हेच खरे वाचन. पण हे सगळं पचनी पडायला आधी अपचन होईल इतके वाचन व्हायला लागते. त्यासाठीच तर ग्रंथसंग्रह आणि ग्रंथसंग्रहालये जन्माला येतात. 



Friday 17 April 2015

माझं बाई पुराण

आमची जुनी बाई 20 वर्ष काम करत होती. म्हंटलं तर 20 वर्ष जास्त वाटतात. पण मुलांना वाढवण्यात शाळेची दहा वर्ष कशी जातात हे कळत नाही. दिवस कसे अगदी कापरासारखे उडून जातात. आमच्या बाईचं नाव ‘गंगाबाई धोपट’. माझ्या मुलीच्या वेळी सातवा महिना लागला आणि मी घरी कामाला बाई ठेवावी असा विचार केला. तोपर्यंत मीच करत असे सगळं काम. चार लोकांना स्थळाबद्दल सांगून ठेवावं तसं मी चार लोकांना बाई हवीय म्हणून बोलून ठेवलं होतं. बर्या चदा आमच्या लायब्ररीतला एक चालता बोलता माहिती तंत्रज्ञानाचा कोश असलेला आमचा शिपाई प्रभाकर याने त्याच्या ‘गुगल’ वरुन माहिती काढली. आणि मला म्हणाला ‘’मॅडम! दुपारी घरी हाव ना? मी बाईला घिऊन येतो.’’ बोलल्याप्रमाणे तो एका मोठ्या मोठ्या फुलांची चापून चोपून नऊवारी साडी  नेसलेल्या बाईला घेऊन आला. पहिलंच वाक्य...’’जल्ला..हिते र्हातावं काय तुमी? मी याच बिल्डींगीमधे काम करतो.’’ मग तिनं घर बघितलं. माझ्या सातव्या महिन्याच्या पोटाकडे बघत बघत तिने विचारलं घरी कोन कोन? सासू नाय का? कामाला जाता का? सायेबांना कामाला कुठे जायला लागतं? अशा तिच्या चौकशींना सामोरं जात पैशाची बोलणी झाली. कोणतीही घासाघिस न करता बाई पटली. ;) ‘’उद्यापासून येतो’’ असं म्हणत दुसर्या  दिवशी बरोब्बर 9.30 वाजता आली. छान स्वच्छ काम करुन गेली. फारशी ओळख नसल्याने जास्त बोलली नाही. मी तर खुशच झाले. एखाद्याला खाखई सुटावी ना तसं तिला कामाबद्दल होतं. कपडे धुवायला कमी असले तर शोधून शोधून कपडे धुवायला घ्यायची. जरा जास्त ओळख झाल्यावर मला म्हणायची ‘’आता यावेली पोरगाच हून्दे. भैणीला भाव हवा’’ मी तिला म्हणायचे ‘’अहो बाई आपलं पोर, मग ते कोणीही असू दे. हाती पायी धड असलं म्हणजे काही नको. मुलगाच हवा असं का?’’ पण ‘’वंशाला दिवा हवा’’ या चौकटीच्या विचारात घट्ट बांधलेली असल्याने ‘’याखेपेस मुलगाच व्हनार’’ असं म्हणायची. 

 यथावकाश मी माझ्या मुलीला घरी घेऊन आले. ही कामच करत होती. पण काम झालं तरी तिने बाळाला लांबूनच बघितलं. आणि बाळाच्या आजीला म्हणाली ‘’पोर गोरी हाय हो आजी.’’ मला कळेना की ही जवळ का येत नाही बाळाच्या? मनात म्हंटलं, असेल घाईत. मग दुसऱ्याच दिवशी येऊन हात पाय धूऊन बाळाशी गप्पा मारायला लागली. ‘’सोनी..वो सोनी. आलीस काय तू? आईला तरास जाला ना? आता जागायचं नाय. गपचिप झोपायचं’’ हा संवाद आम्ही सगळेच ऐकत आणि बघत होतो. मला म्हणाली ‘’ काल चौथा दिवस. भ्हायेरची होते. मंग शिवाशिव नको. म्हणून लांबून बगितलं. 
अत्यंत विश्वासू. खिशात वेलदोडा सापडला तरी परत करणारी. एकदा याच्या खिशात वेलदोडा सापडला. तर ‘’तेंच्या खिशात येलची गावली. मी पानाबरोबर खल्ली’’ अशी कबुली दिली. अशा काही काही प्रसंगानंतर ती आमच्या घरातलीच एक झाली. 
तिला एकूण चार मुलं. तीन मुलगे आणि एक मुलगी. अक्षरओळखही नसलेली ही बाई अत्यंत व्यवहार चतुर आहे. एकाचवेळी मुलीला आणि दोन्ही मुलांना मुलं होणार म्हणून जरा विचारात पडली होती. मुलांना वाटे की आईने आपल्याकडे मुल सांभाळायला यावं. या कात्रीत सापडून तिला काही दिवस सुचत नव्हतं. मग एका फटक्यात तिनं ठरवलं की आता सहा महिने आपण बदली बाई देऊ. सध्या तिच्या घरात एकाच वेळी 3 नातवंडं झाल्याने तिलाच बाळंतपणाची सुट्टी घ्यायला लागली आहे.  म्हणून बदलीची बाई मी मनात नसताना झेपवतीये. 

Saturday 28 March 2015

स्वगत एका पुस्तकाचं

     माझं नाव ‘मृत्यूनंतरचे जीवन’...मला लेखक अ.कृ. देशपांडे यांनी जन्माला घातलं. आणि शाम जोशी यांनी मला आपल्या घरी अंधेरीला नेलं. शाम जोशी म्हणजे व्यंगचित्रकार नव्हे. शेकडा 75 ते 80% सामान्य माणसांपैकी हा एक. घरात पाच माणसं. शाम, त्यांची पत्नी आणि तीन मुली.
      कोल्हापूरहून मला यांनी घरी आणलं तेव्हा सुरवातीला मला अचानक कोरड्या हवेतून दमट हवेत गेल्यावर हवा बदलाचा जो त्रास व्हायचा तो झालाच. माझी पानं दमटसर व्हायला लागली. कोपरे वाकायला लागले. मग मात्र मी सरावलो.  जोश्यांनी मला पांढरं शुभ्र कव्हर घातलं. बाळाला दुपट्यात गुंडाळतात तसंच वाटलं मला. पण बरं वाटलं. माझ्या अंतरंगात काय असेल याची घरातल्या प्रत्येकालाच उत्सुकता असल्याने ज्याला जसं जसं हवंय तसं तसं ते डोकावत गेले. कोणी प्रस्तावना वाचली. तर कोणी नुसते फोटोच बघितले. तर जोशी नवरा बायकोंनी मला संपूर्णपणे जाणून घेतलं. काहींनी म्हंटलं की कशाला ते असल्या विषयावरचं वाचावं? आपण मेल्यानंतर आपल्याला काय कळणारे? तेव्हा मजेत कोणीतरी म्हणालं की आता थियरी वाचू. मग प्रॅक्टीकल करायचं आहेच. सगळ्यांचं वाचून, चाळून झाल्यावर मला एका कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलं. काय योगायोग होता तो? म्हणजे बघा…प्रवासात आपल्या शेजारी कोण येतंय यावर बर्‍याचदा आपला प्रवास कसा होतो ते ठरतं. किंवा नव्या इमारतीत आपला शेजार कोण असेल याची उत्सुकता असते, तसंच काहीसं माझं झालं. मी ज्या कपाटात बसलो होतो तिथे काही वेळ मी एकटाच होतो. काही वेळाने माझ्या पुढे ‘गीतादर्शन’ चे अंक आणि माझ्या पाठीशी विनोबांची ‘गीता प्रवचने’ अशी पुस्तके आली. माझी अवस्था काय झाली असेल हे वेगळं सांगायला नको. असो.
     यशावकाश मी आल्यानंतर वर्षभरात जोश्यांच्या घरातल्या दोन चिमण्या एकाच दिवशी उडून गेल्या. म्हणजे मोठ्या आणि मधल्या मुलीचं लग्न झालं. आणि एके दिवशी एक अघटीत घटना घडली. जोश्यांची मोठी मुलगी एका रस्त्यावरच्या अपघातात या जगाला सोडून गेली. आणि तिच्याबरोबर तिच्या पोटातलं चार महिन्यांचं बाळही चार महिन्यांचा गर्भवास भोगून गेलं. या दुःखाच्या काळात मला कपाटातून परत बाहेर काढलं गेलं. जाणारा जीव तर गेला. आता गेलेल्या जीवाचं काय झालं असावं? तिला मुक्ती मिळाली असेल का? कितीतरी प्रश्न घरातल्या प्रत्येकाच्या मनात येत होते. आणि जो तो ज्याला जमेल तसं आपापली उत्तरं माझ्या अंतरंगात शोधत होतं. कोणाच्या मनाचं किती समाधान झालं माहित नाही. कोणाच्या घरी कोणी जन्म घ्यायचा हे जसं तो वरचा ठरवतो, तसंच मी पण यांच्या घरात आलो असेन. असं मला पटकन वाटून गेलं.
     काळ हे सगळ्या दुःखावर औषध आहे. असं म्हणतात. आता दुःख विसरुन असं नाही म्हणता येणार. तर दुःखाला सोबत घेऊन जो तो आपापल्या कामाला लागला. मधल्या काळात मी जोश्यांच्याच घरात निद्रितावस्थेत होतो. आणि परत दहा वर्षांनी या कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. मी पुन्हा कपाटातून बाहेर आलो. आता मात्र माझी जागा टिपॉय च्या खाली होती. आणि एक दिवस मला दुसर्या कोणाच्या तरी हाती सुपूर्द करण्यात आले. नक्की दिवस आठवत नाही. पण मी अशाच कोणाच्या तरी घरी गेलो होतो जिथे कोणाचा तरी मृत्यु झाला होता.
     मला त्या घरात येऊन बरीच वर्ष झाली होती. पण तरीही ते घर माझं नव्हतं. मधून मधून मला माझ्या घराची आठवण व्हायची. आणि या घरातली माणसंही आता राहतं घर सोडून दुसरीकडे जाणार असं कानावर आलं होतं.  घरातल्या सामानाची आवराआवर करायला लागल्यावर मात्र मला माझ्या जवळच्या माणसांची तीव्रतेने आठवण व्हायला लागली. ‘’काहीही करा, पण मला माझ्या घरी नेऊन सोडा.’’ असा माझा आक्रोश सुरु होता. पण माझा आक्रोश कोणाला कळणार होता ना दिसणार होता. शेवटी मनापासून सगळी जीर्ण झालेली पानं जोडून मनात एक इच्छा आणली. आणि येणार्‍या प्रसंगाला सामोरं जायला तयार झालो. माळ्यावरचे, कपाटातले, आजुबाजूचे असे माझे अनेक सोबतींना घेऊन आम्हाला एका दोरीनं बांधण्यात आलं. आणि एकत्र उचलून एका मोठ्या पिशवीत घातलं. लहान पुस्तकं मुसमुसत होती. तर माझ्यासारखी चार घराची हवा, धूळ चाखलेली मूकपणे, निमुटपणे बसून होती. सहज मनात आलं की त्या हिटलरच्या सैन्याने ज्यू लोकांनाही एका आगगाडीच्या डब्यातून जसं कोंडून छळछावणीकडे नेलं होतं, पण त्या बिचार्‍यांना आपण कुठे जातोय याचा पत्ताच नव्हता. तसंच काहीसं आमचं झालंय असंच वाटलं. आता आपली सगळ्यांची ताटातूट होणार या दुःखाने काही सुचत नव्हतं.
     काही वेळातच आमची रवानगी एका ग्रंथालयात करण्यात आली. दोन दिवस आम्ही तसेच पोत्यात पडून होतो. मग आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. आहाहा!..किती तरी वेळानी आम्हाला ताजी हवा मिळत होती. मग आम्हाला एकमेकांपासून वेगळं केलं गेलं. काहींना विभागाप्रमाणे दुसर्‍या पुस्तकांबरोबर बसवलं गेलं. लहान पुस्तकं पटकन त्यांच्यात मिसळून गेली. काही मोठी पुस्तकं एकमेकांना धरून निमुट होती. मला मात्र माझं काय होणार हे कळत नव्हतं. मला एका बाजूला सगळ्यांपासून लांब अनोळखी पुस्तकात ठेवलं होतं. तेवढ्यात टिकली लावावी तसं माझ्या अंगावर काहीतरी लावलं गेलं. उत्सुकतेने मान वर करून काय लावलंय ते बघितलं. ‘मॅडमना दाखवणे’ अशी चिठ्ठी माझ्यावर लावली होती. का कुणास ठाऊक, मला या नव्या जागेत आपल्या कळपात आल्यासारखं वाटत होतं. मला जरा हायसं वाटलं.
       दुसर्‍या दिवशी सकाळी मला आतल्या टेबलावर ठेवण्यात आलं. मॅडम आल्या असाव्यात. अन् अचानक समोर मी जे पाहिलं त्यावर माझा स्वतःचा विश्वासच बसेना. त्यादिवशी अजून काही तरी मागणं मागितलं असतं तरी मला ते निश्चितच मिळालं असतं. मी शाम जोशी यांच्या मधल्या मुलीच्या समोर होतो. त्याक्षणी मला असं वाटलं की मला बोलता आलं असतं तर? त्या टॉकींग बुक सारखं? मी जीवाच्या आकांताने तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्या नादात मी एकदा घरंगळलो पण. आणि अखेर एकदाचं तिने मला हातात घेतलंच. काहीही म्हणा.. आपल्या माणसाचा स्पर्श डोळे झाकूनही ओळखता येतोच. तसंच काहीसं तिचं झालं असावं. मला तिने दोन वेळा आतून उघडून बघितलं. परत माझ्या कव्हरवरचं नाव बघितलं. त्या नावावरून तिने अलगद तर्जनी फिरवली. आणि परत विश्वास न बसून आतलं पान उघडलं. समोर मजकूर होता
‘’सौ.शुभदा शाम जोशी, अंधेरी, 19 मे 1984’’
मी माझ्या…माझ्या स्वतःच्या माणसांमध्ये आलो होतो. ताटातूट होऊन इतक्या वर्षात मी परत आपल्या माणसात जाईन ही आशाच सोडली होती. पण माझं नशीब खूप चांगलं होतं. असंच म्हणावं लागेल. नाही मानावंच लागेल.
तर अशी ही माझी कहाणी सुफळ संपूर्ण झाली.