Saturday 28 March 2015

स्वगत एका पुस्तकाचं

     माझं नाव ‘मृत्यूनंतरचे जीवन’...मला लेखक अ.कृ. देशपांडे यांनी जन्माला घातलं. आणि शाम जोशी यांनी मला आपल्या घरी अंधेरीला नेलं. शाम जोशी म्हणजे व्यंगचित्रकार नव्हे. शेकडा 75 ते 80% सामान्य माणसांपैकी हा एक. घरात पाच माणसं. शाम, त्यांची पत्नी आणि तीन मुली.
      कोल्हापूरहून मला यांनी घरी आणलं तेव्हा सुरवातीला मला अचानक कोरड्या हवेतून दमट हवेत गेल्यावर हवा बदलाचा जो त्रास व्हायचा तो झालाच. माझी पानं दमटसर व्हायला लागली. कोपरे वाकायला लागले. मग मात्र मी सरावलो.  जोश्यांनी मला पांढरं शुभ्र कव्हर घातलं. बाळाला दुपट्यात गुंडाळतात तसंच वाटलं मला. पण बरं वाटलं. माझ्या अंतरंगात काय असेल याची घरातल्या प्रत्येकालाच उत्सुकता असल्याने ज्याला जसं जसं हवंय तसं तसं ते डोकावत गेले. कोणी प्रस्तावना वाचली. तर कोणी नुसते फोटोच बघितले. तर जोशी नवरा बायकोंनी मला संपूर्णपणे जाणून घेतलं. काहींनी म्हंटलं की कशाला ते असल्या विषयावरचं वाचावं? आपण मेल्यानंतर आपल्याला काय कळणारे? तेव्हा मजेत कोणीतरी म्हणालं की आता थियरी वाचू. मग प्रॅक्टीकल करायचं आहेच. सगळ्यांचं वाचून, चाळून झाल्यावर मला एका कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलं. काय योगायोग होता तो? म्हणजे बघा…प्रवासात आपल्या शेजारी कोण येतंय यावर बर्‍याचदा आपला प्रवास कसा होतो ते ठरतं. किंवा नव्या इमारतीत आपला शेजार कोण असेल याची उत्सुकता असते, तसंच काहीसं माझं झालं. मी ज्या कपाटात बसलो होतो तिथे काही वेळ मी एकटाच होतो. काही वेळाने माझ्या पुढे ‘गीतादर्शन’ चे अंक आणि माझ्या पाठीशी विनोबांची ‘गीता प्रवचने’ अशी पुस्तके आली. माझी अवस्था काय झाली असेल हे वेगळं सांगायला नको. असो.
     यशावकाश मी आल्यानंतर वर्षभरात जोश्यांच्या घरातल्या दोन चिमण्या एकाच दिवशी उडून गेल्या. म्हणजे मोठ्या आणि मधल्या मुलीचं लग्न झालं. आणि एके दिवशी एक अघटीत घटना घडली. जोश्यांची मोठी मुलगी एका रस्त्यावरच्या अपघातात या जगाला सोडून गेली. आणि तिच्याबरोबर तिच्या पोटातलं चार महिन्यांचं बाळही चार महिन्यांचा गर्भवास भोगून गेलं. या दुःखाच्या काळात मला कपाटातून परत बाहेर काढलं गेलं. जाणारा जीव तर गेला. आता गेलेल्या जीवाचं काय झालं असावं? तिला मुक्ती मिळाली असेल का? कितीतरी प्रश्न घरातल्या प्रत्येकाच्या मनात येत होते. आणि जो तो ज्याला जमेल तसं आपापली उत्तरं माझ्या अंतरंगात शोधत होतं. कोणाच्या मनाचं किती समाधान झालं माहित नाही. कोणाच्या घरी कोणी जन्म घ्यायचा हे जसं तो वरचा ठरवतो, तसंच मी पण यांच्या घरात आलो असेन. असं मला पटकन वाटून गेलं.
     काळ हे सगळ्या दुःखावर औषध आहे. असं म्हणतात. आता दुःख विसरुन असं नाही म्हणता येणार. तर दुःखाला सोबत घेऊन जो तो आपापल्या कामाला लागला. मधल्या काळात मी जोश्यांच्याच घरात निद्रितावस्थेत होतो. आणि परत दहा वर्षांनी या कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. मी पुन्हा कपाटातून बाहेर आलो. आता मात्र माझी जागा टिपॉय च्या खाली होती. आणि एक दिवस मला दुसर्या कोणाच्या तरी हाती सुपूर्द करण्यात आले. नक्की दिवस आठवत नाही. पण मी अशाच कोणाच्या तरी घरी गेलो होतो जिथे कोणाचा तरी मृत्यु झाला होता.
     मला त्या घरात येऊन बरीच वर्ष झाली होती. पण तरीही ते घर माझं नव्हतं. मधून मधून मला माझ्या घराची आठवण व्हायची. आणि या घरातली माणसंही आता राहतं घर सोडून दुसरीकडे जाणार असं कानावर आलं होतं.  घरातल्या सामानाची आवराआवर करायला लागल्यावर मात्र मला माझ्या जवळच्या माणसांची तीव्रतेने आठवण व्हायला लागली. ‘’काहीही करा, पण मला माझ्या घरी नेऊन सोडा.’’ असा माझा आक्रोश सुरु होता. पण माझा आक्रोश कोणाला कळणार होता ना दिसणार होता. शेवटी मनापासून सगळी जीर्ण झालेली पानं जोडून मनात एक इच्छा आणली. आणि येणार्‍या प्रसंगाला सामोरं जायला तयार झालो. माळ्यावरचे, कपाटातले, आजुबाजूचे असे माझे अनेक सोबतींना घेऊन आम्हाला एका दोरीनं बांधण्यात आलं. आणि एकत्र उचलून एका मोठ्या पिशवीत घातलं. लहान पुस्तकं मुसमुसत होती. तर माझ्यासारखी चार घराची हवा, धूळ चाखलेली मूकपणे, निमुटपणे बसून होती. सहज मनात आलं की त्या हिटलरच्या सैन्याने ज्यू लोकांनाही एका आगगाडीच्या डब्यातून जसं कोंडून छळछावणीकडे नेलं होतं, पण त्या बिचार्‍यांना आपण कुठे जातोय याचा पत्ताच नव्हता. तसंच काहीसं आमचं झालंय असंच वाटलं. आता आपली सगळ्यांची ताटातूट होणार या दुःखाने काही सुचत नव्हतं.
     काही वेळातच आमची रवानगी एका ग्रंथालयात करण्यात आली. दोन दिवस आम्ही तसेच पोत्यात पडून होतो. मग आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. आहाहा!..किती तरी वेळानी आम्हाला ताजी हवा मिळत होती. मग आम्हाला एकमेकांपासून वेगळं केलं गेलं. काहींना विभागाप्रमाणे दुसर्‍या पुस्तकांबरोबर बसवलं गेलं. लहान पुस्तकं पटकन त्यांच्यात मिसळून गेली. काही मोठी पुस्तकं एकमेकांना धरून निमुट होती. मला मात्र माझं काय होणार हे कळत नव्हतं. मला एका बाजूला सगळ्यांपासून लांब अनोळखी पुस्तकात ठेवलं होतं. तेवढ्यात टिकली लावावी तसं माझ्या अंगावर काहीतरी लावलं गेलं. उत्सुकतेने मान वर करून काय लावलंय ते बघितलं. ‘मॅडमना दाखवणे’ अशी चिठ्ठी माझ्यावर लावली होती. का कुणास ठाऊक, मला या नव्या जागेत आपल्या कळपात आल्यासारखं वाटत होतं. मला जरा हायसं वाटलं.
       दुसर्‍या दिवशी सकाळी मला आतल्या टेबलावर ठेवण्यात आलं. मॅडम आल्या असाव्यात. अन् अचानक समोर मी जे पाहिलं त्यावर माझा स्वतःचा विश्वासच बसेना. त्यादिवशी अजून काही तरी मागणं मागितलं असतं तरी मला ते निश्चितच मिळालं असतं. मी शाम जोशी यांच्या मधल्या मुलीच्या समोर होतो. त्याक्षणी मला असं वाटलं की मला बोलता आलं असतं तर? त्या टॉकींग बुक सारखं? मी जीवाच्या आकांताने तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्या नादात मी एकदा घरंगळलो पण. आणि अखेर एकदाचं तिने मला हातात घेतलंच. काहीही म्हणा.. आपल्या माणसाचा स्पर्श डोळे झाकूनही ओळखता येतोच. तसंच काहीसं तिचं झालं असावं. मला तिने दोन वेळा आतून उघडून बघितलं. परत माझ्या कव्हरवरचं नाव बघितलं. त्या नावावरून तिने अलगद तर्जनी फिरवली. आणि परत विश्वास न बसून आतलं पान उघडलं. समोर मजकूर होता
‘’सौ.शुभदा शाम जोशी, अंधेरी, 19 मे 1984’’
मी माझ्या…माझ्या स्वतःच्या माणसांमध्ये आलो होतो. ताटातूट होऊन इतक्या वर्षात मी परत आपल्या माणसात जाईन ही आशाच सोडली होती. पण माझं नशीब खूप चांगलं होतं. असंच म्हणावं लागेल. नाही मानावंच लागेल.
तर अशी ही माझी कहाणी सुफळ संपूर्ण झाली.