Tuesday 19 January 2016

अंजनवेल

हे आमचं अंजनवेलचं घर. जवळ जवळ 200 वर्ष जुनं. हे घर आता पाडलंय.पण पाडण्यापूर्वी ' ज्येष्ठ वैद्य महापुरषांनी' या घराचा काना कोपरा टिपून घेतला. म्हणजे या घरातल्या सगळ्या खोल्यांमधून व्हिडीओ शुटींग केलं. आणि आम्ही पुढच्या पिढीतल्या सुना, नातवंड, जावई यांना या एेतिहासीक वास्तू बद्दलचा आठवणींचा एक छान अनमोल ठेवा, खजिनाच दिला.
प्रत्येक जुन्या घराला एक इतिहास असतो. अगदी त्याचे वासे, खांब, दगड कुठून जमा केलं तिथून हा इतिहास सुरु होतो. मग पिढी दर पिढी हा हस्तांतरीत केला जातो. माझ्या सासुबाई, सासरे, चुलत सासरे यांनी या घराविषयी मला इतकं आपुलकीने सांगितलंय की ते जरी घराबाबत पुनःपुन्हा सांगायला लागले तरी एेकावसं वाटतं. आपण चार दिवस बाहेरगावी हॉटेलमधे राहीलो तरी त्या जागेविषयी आपल्याला आपुलकी वाटते. मग इथे तर जन्मापासून राहीलेले.
या घरासाठी आहिल्याबाई होळकरांच्या वाड्याचे खांब वापरले होते. घाटी चढून वर आलं की अंगण्यात (कोकणातला खास शब्दंय) डाव्या बाजूला बांधाजवळ पपनसाचं, रामफळाचं आणि प्राजक्ताचं झाड होतं. सारवलेल्या अंगण्यात प्राजक्तचा सडा असायचाच.
घरातला कर्ता पुरुष घरी आल्यावर झोपाळ्यावर बसला की कुरकुरणार्‍या कड्या माजघरातल्या सुनांना 'ते आलेत' ची सूचना द्यायच्या. झोपाळ्याच्या मागच्या बाजूला पणजी आजीची तीन फळकुटं आडवी करुन तयार केलेली कॉट असायची. लगतच्या भिंतीला स्वैपाकघरात उघडणारी खिडकी होती. तिथून सुनांवर लक्ष ठेवता येत असे. पणजी आजीचं नाक तीक्ष्ण होतं. फोडणी जास्त झालेली कळायची तिला. पण ती प्रेमळ होती. लग्न न झालेल्या नणंदा जेवल्यावर मागचं आवरायला लागायला नको म्हणून घरात नेहमी हलणार्‍या पाळण्यातल्या पोराला खेळवत बसायच्या. हे असं नेहमी कानावर पडलेलं.
पडवी, अंधारं माजघर, बाळंतिणीची खोली, पाळण्यासाठी लावलेल्या लोखंडी कड्या, माळ्यावरचा लाकडी पाळणा, दुधावणी, देवघर, वरची माडी, माडीवरुन दिसणारी खाडी, पोहे कांडण्याची उखळ हे सगळं सीडीत बघितलं की असं वाटतं की आत्ता सासुबाई म्हणतील '' मंजिरी माडीवर असलो की काय वारा यायचा. त्याकाळी पंखे कुठे असायचे? गरजच नव्हती म्हणा.'' पण बाबाच (सासुबाईंचे सासरे) असायचे माडीवर. ते नसतील तेव्हा जायचं. काय काय दिवस पाहीलेत या घरानं.'' सदोदित देतच आलं हे घर. आणि पडतानाही सगळ्यांना चिमुट चिमुट का होईना दिलंच काहीतरी. चांगलं केलंन् हो सीडी केली ते.''
खरंच..ज्यांना शक्य असेल त्यांनी पुढच्या पिढीसाठी चलत् चित्रमय इतिहास करुन ठेवावाच. मजा येते अधून मधून बघायला नि आठवणीत रमायला.