Thursday 3 May 2018

लेह, लडाख, पेंगॉंग त्सो

‘’जुले…जुले’’..म्हणजे नमस्कार. आमच्या भ्रमंतीचा शेवट होता ‘पेंगॉंग त्सो’. त्सो म्हणजे लेक. या लेकला थ्री इडियट्स मधे बघितलं होतं. याचं पाणी खारट आहे हेही माहित होतं. याच्या काठी रहायचंय ही कल्पनाही मला फारच रोमँटिक वाटली होती. 


आम्ही हळूहळू पेंगॉंग त्सो च्या दिशेने जात होतो. वाटेत अनेक वळणावळणाचे डोंगर पार करत होतो. लहानपणी गोष्टी वाचल्याचं आठवतंय की ‘’ दूर देशी एक राजा होऊन गेला. तो सात डोंगर, सात नद्या, सात समुद्र पार केल्यावर त्याच्या नगरी आपण पोचतो. इथे बाकी काही नाही पण सात डोंगर पालथे घातले. वाटायचं, आता सपाट रस्ता येईल, आणि तो यायचाही. पण एक वळण घेतलं की पुन्हा डोंगर चढायला सुरवात. वाटेत अनेक स्वच्छ पाण्याचे ओहळ तुकड्या तुकड्याने रस्ता धुवत होते. मैलोन् मैल रस्त्यात एखाद दुसरी प्रवासी गाडी नाही तर आर्मीचा ट्रक दिसे. रस्त्यात माणसं नाहीच दिसली. खुप पुढे गेल्यावर 20/25 माणसं रस्ता दुरुस्तीचं काम करत होती. नुकतेच चार दिवसांपूर्वी उजव्या बाजूच्या डोंगरावरुन काही दगड, माती, धोंडे आणि पाणी बागडत खाली आले आणि ‘इथे’ रस्ता होता याची खूण मिटवून गेले होते. आता ही रस्त्यावर गच्च बसलेली माती, दगड बाजूला करणे म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम. मशीन्स असली तरी बारीक सारीक कामं माणसंच करणार. इथं चार पावलं भरभर चाललं तरी आमची प्रचंड दमछाक व्हायची. पण इथल्या माणसांनी ते अवघड काम लवकरात लवकर पूर्ण केल्यानंच आमच्या सारख्या प्रवाश्यांना पुढे जाता आलं. 
आणि अखेर लांबून ‘पेंगॉंग त्सो’ चा त्रिकोणी तुकडा दिसलाच. जसजसं पुढे गेलो तसतसं लेकची व्याप्ती किती मोठी आहे ते दिसलं. आमची टेंपो ट्रॅव्हलर अनेक दगड धोंडे तुडवत पुढे जात होती. आम्ही सीटला, पाल भितींला चिकटते तसे चिकटून तसे घट्ट बसायचा प्रयत्न करत होतो. काही वेळा हळकुंडाला बंद डब्यात घालून हलवल्यावर त्याला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटत होतं. आणि अखेर आम्ही ‘पेंगॉंग त्सो’ ला पोचलोच.
इथे माझं प्रवास वर्णन संपून निरिक्षण + विचार मंथन सुरु झालं. 
1. मी महाराष्ट्रात जे काही गड किल्ले बघितले ते मला जास्त बोलके वाटले.
2. सह्याद्री म्हणे 65 दशलक्ष वर्ष जुना आहे आणि हिमालय 50. म्हणजे सह्याद्री हा हिमालयाचा काका नाही तर दादा आहे. सह्याद्री कणखर आहे. आणि हे डोंगर मला कधी हळवे तर कधी रागीट वाटले. असं म्हणायला हरकत नाही.
3. मी ही जी काही भ्रमंती केली तो भाग आपलाच आहे. पण कदाचित माझं अर्ध आयुष्य महाराष्ट्रात गेल्यानं असेल म्हणा मला ते उघडे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटत होते. 
4. ‘पेंगॉंग त्सो’ आहे खुप छान. प्रश्नच नाही. पण तरीही कुठेतरी कमतरता वाटत असल्या सारखं वाटलं. लेक जवळून बघताना या लेकपाशी मला शांत रम्य तळ्याकाठी बसल्यासारखं वाटत नव्हतं. तिथे एक गूढ शांतता होती. पुन्हा एकदा मला ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता’’ ओळ आठवली.
5. प्रवास सुरु करायच्या आधी जिथे जाणार तिकडची भौगोलिक परिस्थिती समजाऊन घ्यायलाच हवी. आम्ही ती समजाऊन घेतली तरी ‘कळतंय पण वळत नाही ‘’ असं काही वेळा होत होतं. 
6. प्रवासात वळणा वळणावर ‘’गाडी सावकाश, जपून चालवावी’’ या आशायाचे वाचनीय बोर्ड आहेत. मला काहींचे फोटो घेता आले. तर काही पटकन लिहून घेत होते. पण गाडी वळणं घेत असल्याने अक्षरही इतकं वळणदार आलं की नंतर वाचू म्हणता आपलंच अक्षर वाचता येईना.
7. इकडची माणसं कायम हसतमुख. ‘’मॅडमजी’’ आणि ‘’जी मॅडमजी’’ शिवाय वाक्याची सुरवात, शेवट होत नसे. 
8. ‘सोनम’ हे नाव तिकडे आवडतं आहे.
आपल्या भारतीय सेनेला त्रिवार मानाचा मुजरा. सगळे जुग जुग जियो रे. 
जाता जाता मैत्रीचा सल्ला.
शक्यतो हा भाग पन्नाशीच्या आत बघा. तर जास्त एन्जॉय कराल. मला इथे परत जायला आवडेल. पण ते थंडीला सुरवात होताना. बघू केव्हा योग येतो ते.
पण इथे जाल तर तिकडचंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा.
‘’Don’t be a gama in the land of lamas’’


लेह, लडाख, मॉनेस्ट्री, तुरतूक (turtuk) -२


लेह लद्दाख हा आपला भारताचाच भाग. सहज मनात आलं, कोणताही मनुष्य प्राणी आपल्या शरीरावर , स्वतःवर एकसारखंच प्रेम करतो. म्हणजे मला माझे पाय आवडत नाहीत म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा माझे केस कुरळे आहेत म्हणून मला आवडत नाहीत असं तर होत नाही ना. तशाच काहीशा भावना मला या लेह, लद्दाख आणि आम्ही ज्या ज्या भागात फिरलो त्याबद्दल वाटलं. मला इथल्या कधी न पाहिलेल्या माणसांबद्दल आपलेपणा वाटत होता. इतकं अदबशीर बोलणं, हसतमुख चेहेरे बघून मन सूर्यफुलासारखं फुलून जात होतं. मी भारतात तशी फारशी फिरले नाहीये खरं तर. पण हा माझाच देश. मग मला त्याचे कानेकोपरे माहीत असायलाच हवेत. आणि मला ते आपलेसे वाटले. इथे मला जे म्हणायचंय ते थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

आम्ही लामायुरुतली मॉनेस्ट्री बघितली. त्याच धर्तीच्या अनेक मॉनेस्ट्री बघितल्या. शांत, गंभीर वातावरण होतं सगळीकडे. मला अशा शांत ठिकाणी गेलं की रामदासांचं करुणाष्टक आठवतं. आता पाठ नसलं तरी त्यातली ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता ‘’ ही ओळ मात्र हटकून आठवते. याचं कारण मला कळलेलं नाही. 

आमच्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याच्या अव्याहत प्रवासात मुंबईत फारसे बघायला न मिळणारे भारतीय सेनेतले स्मार्ट, तरतरीत, जवान बघायला मिळाले. भारतीय सेनेचे ते ‘मिलिट्री ग्रीन’ रंगाचे ते ट्रक्स, जिप्सीतून जाणारे सेनेचे अधिकारी मी काहीवेळा हळूच तर काहीवेळा गॉगल लावला असल्याने एकटक बघत होते. असो. या मोठ्या प्रवासात एक दिवस तुरतुक साठी राखून ठेवला होता. यु पीन सारखे रस्ते, अगदी शेजारुन वहाणारी श्योक नदी. ही नदी आपल्याबरोबर खुप माती, वाहून नेत असल्याने तिचं पाणी काळसर, चिखल मिसळल्यासारखं वाटत होतं. काही दिवसांनी पाणी संथावलं की म्हणे हिचं पाणीही निळसार झाक असलेलं दिसतं. 

खारदुंग ला खिंडीत जाण्याचा रस्ता, तसंच जवळपासचे जे काही रस्ते बनवलेत त्याला तोड नाही. हे रस्ते बनवण्याचं श्रेय ब्रिगेडियर वोंबतकेरे यांना जातं. इकडे निसर्गाचं केव्हा बिनसेल ते सांगता येत नाही. बिनसलं असो की नसो. मनात आलं की येतात मोठमोठे दगड बागडत खाली. आपण आपला जीव चिमटीतच पकडलेला असतो. मूठ फार मोठी वाटते. तरीही इथे वहानांचा अव्याहत प्रवाह चालू असतो. पण दिवसाच. कारण ऊन जसजसं चढेल तसतसं कुठून ओहोळ वहात येतील आणि आपल्याबरोबर सोबत किती आणि कश्या दगडधोंड्याना घेऊन येईल याचा नेम नसतो. 

आम्ही तुरतुकला पोचलो. हे छोटसं गाव पाकिस्तानच्या ताब्यातून आपण 1970 ला घेतलं. पाकिस्तानी सीमेपासून फक्त सात किमी अंतरावर. इथे लोकं बल्ति भाषा बोलतात. चारही बाजून उंचच उंच डोंगर आणि मधे आमचं रहाण्याचं ठिकाण. बांधकाम सुरु असलेल्या हॉटेल तुरतुक मधे पाऊल टाकल्याबरोबर मोठ्या ताटात ओले, सुके जरदाळू ठेवले होते. एकाने ताज्या जरदाळूचा जुस दिला. त्याची चव अमृततुल्य होती. आम्ही दमलेले एका दमात ते अमृत पोटात टाकलं. मुन्नाभाई MBBS मधे मुन्ना म्हणतो ना की ‘’इसको एक बोतल ग्लुकोज चढाना’’ तसंच आम्हाला झालं. या पेयाची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत रहाते. आता तरतरीत झुरळं होऊन जो तो आपापला रहाण्याचा तंबू बघायला लागला. सगळ्या सुविधांनी युक्त असा तो तंबू आणि आजुबाजूची फुलं, हिरवाई बघून मी मनोमन भारतीय सेनेला दुवा दिला. इतकी सुंदर जागा, लोकं,मुलं, बाळं केवळ यांच्यामुळे बघायला मिळाली. 
इथे एक राजा आहे. त्याच्या महालाची पाक आर्मीने पार दुर्दशा करुन टाकली आहे. त्याचं नाव YBGO MOHD KHAN KACHO. आदल्या दिवशी छानसा डगला घालून आल्याने मला तो स्मार्ट वाटला. दुसर्या दिवशी त्यांच्या महालात गेले तर पार रया गेलेल्या अवस्थेत दिसला. गतकाळच्या वैभवाच्या खुणा बघितल्या. सोबत माहिती देणारा जेव्हा पाकिस्तान आर्मीचा उल्लेख करत असे तेव्हा मी या राजाच्या चेहेर्यावरचे भाव बघत असे. काहीही असो. गावची सगळी मंडळी खुश दिसली. मला तिकडे एक लायब्ररी पण दिसली. तीनशे पुस्तकं आहेत तिकडे. 
इथे दोन घरांच्यामधून स्वच्छ पाण्याचे ओहळ वहातात. त्यात मुलं/मुली आपले केस धुतात. आपली डोकी त्या ओहळाच्या पाण्यात भिजवायची. साबण लावायचा. पुन्हा ओहोळात आपलं डोकं खळबळायचं. मजाच वाटली. रोज अंघोळ करत नाहीत ते.

लेह..लद्दाख (लडाख)- १


दहा दिवस घरच्यांपासून लांब गेले होते. अगदी वरच्या टोकाला. लेह लडाख (लद्दाख) ला. खरं तर पाय बोबडं का होईना पण बोलत होते. काश्मीरची एकूण परिस्थिती बघता पोटात बाकबूक होत होतं. पण एकदा ठरवलं की ठरवलं या ठाम विचारामुळे माझा बोजा घेऊन इतर दहा जणांबरोबर मीही प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. सोमवारी श्रीनगरला सकाळी ११ वाजता उतरलो. याआधी हा भाग मी बघितला नसल्याने विमानातूनच सुरवातीला बघायला सुरवात केली. सिनेमातली काही चित्र डोळ्यासमोर होती. वरून तरी छान हिरवं गार दिसत होतं. अलगद खाली उतरलो. बाहेरचं तापमान २९ होतं. ‘किती साठवू दोन डोळ्यांनी’ अशी माझी अवस्था झाली होती. 
बस मधे बसलो. चक्रधारी बोलता बोलता म्हणाला. ‘’आज २८ दिन हो गये बंद को. ये अभी ५ अगस्त तक ऐसेही रहेगा’’ आपल्याला जोडून तीन दिवस आलेली सुट्टी सुखावून जाते. आणि आपण प्लॅन्स आखायला लागतो. सगळीकडचा शुकशुकाट बघून पोटात खड्डा पडला. हॉटेलवर गेलो. तिकडचा स्टाफ आनंदात दिसला. या बंद मुळे आणि आधी घडलेल्या काही भीतीदायक कारणांनी पर्यटकांनी श्रीनगरला लांब वळसा घातल्यानं हाता तोंडातला घास हिरावला गेला होता ना. आम्ही आलो तेवढीच हॉटेलमधे चहल पहल. 
संध्याकाळी हॉटेलच्या समोरच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर समोर बघितलं तर दल सरोवर. त्यातले छोटे छोटे शिकारे बघताना मला ‘जब जब फुल खिले’ मधला ‘’परदेसियोंसे न अखियाँ मिलाना’’ म्हणणारा शशी कपूर आठवला. तर कोणाला ‘काश्मीर की कली’ आठवला. ‘’तासाभरासाठी शिकाऱ्यात बसा. मीना बाजार पर्यंत फिरवून आणतो. ५० रुपये घेईन’’ या बोलीवर डुगडूगत एका शिकार्यात चार जण असे बसलो. एके काळी या सरोवराचं रूप किती देखणं असेल याची जागोजागी खुण पटत होती. हर हायनेस गायत्री देवी म्हातार्या झाल्या तरी सुध्दा सुंदर दिसायच्या, तसंच काहीसं या सरोवराबद्द्ल वाटून गेलं. आपण मात्र कधीही न सुधारण्याच्या कॅटेगरीतलेच. जाऊ तिथे खाऊन आपल्या खुणा ठेवणारे. पाण्यात पाण वनस्पतींशिवाय रिकाम्या कोकच्या, इतर पेयांच्या बाटल्या, लेज, कुरकुरेची पाकीटं तरंगत होती. पाण्यातून सैर करताना डाव्या आणि उजव्या बाजूने विक्रेते अजिजी करत काही वस्तू घ्यायला सांगतात. कोणी ‘’कश्मीरी वेशात फोटो काढून घ्या’’ असं म्हणत हातात फुलांचा गुच्छ देऊ पाहत. या सगळ्यातून वाट काढत काही बारीक सारीक खरेदी करत आम्ही परत हॉटेलवर गेलो. 
यापुढे आम्ही कसे आणि कुठे गेलो ते फार लांबण लावत बसणार नाही. मला कुठे काय वाटलं हे माझं मत सांगणार आहे. 
आम्ही विवेक नागवेकर यांच्या बरोबर गेलो होतो. ते १९८५ पासून ‘लेहवासी’ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मते ते लेहच्या प्रेमात नसून लेह त्यांच्या प्रेमात आहेत. आणि हे खरंही आहे. 
श्रीनगरहून आम्ही सोनमर्ग ला गेलो. तिथून जोझीला पास करून बाल्तर ...अमरनाथ परिसर करत घुमरी, कारगिल स्मारक बघून कारगिलला मुक्काम केलं. त्याच दिवशी आम्ही पूर्वी ‘तिकडच्या’ ताब्यात असलेला आणि आता ‘आपला’ असलेला HUNDERMAN चा भाग आणि आपली पोस्ट बघायला गेलो. खरं तर प्रवास आणि जेवण अंगावर आलं होतं. पण ही संधी कोण सोडेल बाबा? सगळे पोस्ट बघून, सेनेतल्या सावळ्या, उंच, स्मार्ट सैनिकाशी बोलून तरतरीत होऊन हॉटेलवर परतलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी निघून मुलबेकला डोंगरात कोरलेला बुद्ध बघितला. इथून पुढे जाताना ‘मूनलँड’ ला गेलो. हा परिसर म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग असावा तसा आहे. हा भाग बघायला गेलेल्या पर्यटकांनी तिकडे कचरा टाकला आहे. मला सगळ्यात आधी तोच डोळ्यात खुपला.