Saturday 4 August 2018

जन्मसावित्री/ अहेवपण

नमस्कारासाठी वाकले. जन्मसावित्री हो असा आशीर्वाद दिलेला ऐकला आणि याआधी कोणी बरं असा आशीर्वाद दिला होता ते आठवत होते. २०/२२ वर्ष मागे गेले. आमच्या लायब्ररीत जोडीनं येणारे बरेच आहेत. अगदी एक त्याच्या आवडीचं आणि एक तिच्या आवडीचं पुस्तक घेणारेही आहेत. काहींच्यात अहो तुम्ही माझ्या आवडीचा कथासंग्रह घेतच नाही. मला तुमची ती राजकारणावरची पुस्तकं आणि ते लेख वाचायचा कंटाळा येतो असंही म्हणणारी मेहुणं आहेत. काही जोडप्यातली एक जण निव्वळ सोबत म्हणून येणारी आहेत. अशाच जोडप्यांपैकी सौ. सु.वा. भट अशी सही करून सहीच्या खाली आडवी रेष मारून दोन टिंब देणाऱ्या भट काकू मला आठवल्या.
आमच्याच रस्त्यावर तू जागा घेतली आहेस ना मग ये ना एखाद दिवशी, असं नेहमी म्हणत. मी ही हो..हो..येईन..येईन म्हणत असे. भट काकूंच्या गोरेपणाचं वर्णन करायचं झालं तर कुठल्याश्या कादंबरीत एका मुलीचं वर्णन करताना लिहिलेले शब्द मला नेहमी आठवत. लाल भडक गुलाबाच्या पाकळ्या दुधात कुस्करल्या तर त्या पाकळ्यांचा रंग दुधात मिसळून जो गुलाबी रंग येईल अगदी तश्याच वर्णाच्या होत्या. हातात पाटल्या बांगड्यांसोबत मध्ये हिरव्या वर्खाच्या बांगड्या असायच्या. कपाळावर बरोब्बर मधोमध सिंगारचं लाल कुंकू चमकत असायचं. एकही केस वेणीच्या बाहेर येणार नाही इतपत तेल लावलेले काळे भोर केस होते त्यांचे. खांद्याला एक लांब पट्ट्याची पर्स कम पिशवी असायची. भट काकांना ऐतिहासिक पुस्तकांची प्रचंड आवड. लायब्ररीत आल्यावर पिशवीतून काकांना पुस्तकं काढून आपण स्वतः खुर्चीवर बसून राहत. त्यांचं हसणं खूप छान होतं. आवाज मात्र बोलताना कापायचा. बोलताना मधले शब्द काहीवेळा ऐकूच यायचे नाहीत. दोघांची वयं झालेली. काका तर जास्तच वयस्कर. ते दोघेच. त्रिकोण पूर्ण व्हायला तिसरं कोणीच आलं नाही. अशावेळी बायका आपल्या नवऱ्याची आपल्या पोरागत काळजी घेतात तसंच काहीसं यांचंही झालं होतं. आणि ते बघायलाही छान वाटायचं.
काका काकूंची पंधरा दिवसातून एकदा तरी फेरी व्हायचीच. पण त्यावेळी महिना झाला तरी ती दोघं फिरकली नाहीत. काकांना अधून मधून बरं नसायचं पण तरी तसे बरे होते. वाचन हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं. त्यांच्याच सोसायटीतल्या एकांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली. काका गेल्याचं कळलं. अरे बापरे! काय हे? आता काकूंचं कसं होणार? अनेक प्रश्न मनात आले. दोघं होती तेव्हा जायला जमलं नाही. आणि आता त्यांना भेटायचं तर पावलं जड झाली माझी. हिय्या करून गेलेच. दार लोटलेलं होतं. घरात काकू पाटावर तांदूळ निवडत बसल्या होत्या. मी समोरच बसले. जरावेळ शांतता...काकू म्हणाल्या..बघ तुझा घरी येण्याचा योग असा होता. हे असताना नाहीच जमलं यायला. दोघींचे डोळे भरून आले. पाटावर पडलेलं डोळ्यातलं पाणी पदराच्या टोकाला पुसत निवडलेले तांदूळ डब्यात भरले. हे गेले म्हणून भूक लागायची थांबत नाही ना. अन्नमय कोश. खायला हवंच. शेजारी किती दिवस करतील. मग एक दिवस केली सुरवात. रात्री सोबत म्हणून शेजारची यायची. तिलाही म्हणाले मी झोपेन एकटी. लागलं तर तुम्ही आहातच. तीन रात्री नुसती पडून होते. झोप नाहीच लागली. चार दिवशी जरावेळ लागली. आता इतकी सवय झाली की यांच्या आजारपणात झालेल्या जागरणाची कसर पूर्ण करून घेतल्यागत मेल्यासारखी झोपते. मी त्यांचं ऐकत ऐकत घर बघून घेतलं. बाहेरची खोली कागदपत्रांनी आणि पुस्तकांनी भरलेली होती. जुनं समान होतं. लोखंडी कॉट होती. आरामखुर्ची उभी करून ठेवली होती. डोक्याकडचा कापडाचा भाग तेलकट काळा दिसत होता.
काकूंच्या मागोमाग तांदुळाचा डबा घेऊन आत गेले. स्वयंपाकघरात जुनी पितळेची भांडी आणि डबे गुमसुम दिसत होते. अनेक प्लास्टिकच्या छोट्या डब्या होत्या. एक वेगळाच मेथीचा वास येतो तसा वास येत होता. मला का कोण जाणे काकूंकडे चांगलं चार दिवस राहून साफसफाई करावीशी वाटत होती. स्वयंपाकघराने मोकळा श्वास घ्यावा असं वाटत होतं. जसं काही माझे विचार काकुना ऐकायला आल्यागत त्या म्हणाल्या आयुष्यभर यांची सावली होते. यांच्या आवडी निवडी पुरवणं हे माझं आवडीचं काम होतं. अगदी त्याच्या खाण्यापिण्या पासून ते वाचनापर्यंत सगळं त्यांच्या मनासारखं करण्यात माझा जन्म गेला गं. आता हे पसरलेलं घर मला आवरावंसंच वाटत नाही. या सगळ्यात त्यांच्या आठवणी आहेत. ही सुपारीची डबी, यात लिमलेटच्या गोळ्या असत असं एकेक डबा मला त्या दाखवत होत्या. मला भडभडून आलं. मी रडून घेतलं. त्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या असंच असतं बाई. अहेवपणी मरण आलं असतं तर हवं होतं गं. पण मग विचार करते की साधा चहा पण नीट करता यायचा नाही यांना. मी आधी गेले असते तर त्याचे हाल हाल झाले असते. माझाही जीव घुटमळला असता. तसं वृद्धाश्रम हा पर्याय होता पण हे आवरलं कोणी असतं? आता शांत हो. मला हातात कसलीशी बाटली देत म्हणाल्या हे मी घरी केलेलं तेल आहे. हे घेऊन जा. नहायच्या आधी केसांना नीट लाव. इतकं बोलताना त्यांचा आवाज कितीतरी वेळा कापला. मी कानात प्राण गोळा करून सगळं ऐकत होते. तास सव्वा तास बसून त्यांचा निरोप घेतला. नमस्कारासाठी खाली वाकले तर जुनं जातं मला बघत होतं. “जन्मसावित्री हो” असं म्हणल्या त्या. खाली उतरले आणि वर बघितलं तर त्या हात हलवत गॅलरीत उभ्या होत्या. पुन्हा ये असं काहीसं म्हणाल्या. मी अंदाज घेत हो म्हणाले.
काही दिवसांनी काकू लायब्ररीत आल्या. त्यांचं गोरेपण कोमेजल्यागत वाटत होतं. मला एक फोटो दाखवत म्हणाल्या कृष्णकमळाची एका वेळेस बारा फुलं आली. ती घेऊन सुरेखा फोटो स्टुडियोत गेले त्यांच्या सोबत हा फोटो काढला. हा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. पण सध्या आंधळं नक्षत्र लागल्याने तो मला सापडत नाहीये. नंतर काकू जास्त दिवस राहिल्याच नाहीत. एका अर्थी बरंच झालं असं वाटलं.
जन्मसावित्री हो असा आशीर्वाद मी परवा बऱ्याच वर्षांनी ऐकला आणि काकूच आठवल्या. आणि हो, तो तेलाचा वासही आठवला.


बास..बाकी काही नाही.

Thursday 3 May 2018

लेह, लडाख, पेंगॉंग त्सो

‘’जुले…जुले’’..म्हणजे नमस्कार. आमच्या भ्रमंतीचा शेवट होता ‘पेंगॉंग त्सो’. त्सो म्हणजे लेक. या लेकला थ्री इडियट्स मधे बघितलं होतं. याचं पाणी खारट आहे हेही माहित होतं. याच्या काठी रहायचंय ही कल्पनाही मला फारच रोमँटिक वाटली होती. 


आम्ही हळूहळू पेंगॉंग त्सो च्या दिशेने जात होतो. वाटेत अनेक वळणावळणाचे डोंगर पार करत होतो. लहानपणी गोष्टी वाचल्याचं आठवतंय की ‘’ दूर देशी एक राजा होऊन गेला. तो सात डोंगर, सात नद्या, सात समुद्र पार केल्यावर त्याच्या नगरी आपण पोचतो. इथे बाकी काही नाही पण सात डोंगर पालथे घातले. वाटायचं, आता सपाट रस्ता येईल, आणि तो यायचाही. पण एक वळण घेतलं की पुन्हा डोंगर चढायला सुरवात. वाटेत अनेक स्वच्छ पाण्याचे ओहळ तुकड्या तुकड्याने रस्ता धुवत होते. मैलोन् मैल रस्त्यात एखाद दुसरी प्रवासी गाडी नाही तर आर्मीचा ट्रक दिसे. रस्त्यात माणसं नाहीच दिसली. खुप पुढे गेल्यावर 20/25 माणसं रस्ता दुरुस्तीचं काम करत होती. नुकतेच चार दिवसांपूर्वी उजव्या बाजूच्या डोंगरावरुन काही दगड, माती, धोंडे आणि पाणी बागडत खाली आले आणि ‘इथे’ रस्ता होता याची खूण मिटवून गेले होते. आता ही रस्त्यावर गच्च बसलेली माती, दगड बाजूला करणे म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम. मशीन्स असली तरी बारीक सारीक कामं माणसंच करणार. इथं चार पावलं भरभर चाललं तरी आमची प्रचंड दमछाक व्हायची. पण इथल्या माणसांनी ते अवघड काम लवकरात लवकर पूर्ण केल्यानंच आमच्या सारख्या प्रवाश्यांना पुढे जाता आलं. 
आणि अखेर लांबून ‘पेंगॉंग त्सो’ चा त्रिकोणी तुकडा दिसलाच. जसजसं पुढे गेलो तसतसं लेकची व्याप्ती किती मोठी आहे ते दिसलं. आमची टेंपो ट्रॅव्हलर अनेक दगड धोंडे तुडवत पुढे जात होती. आम्ही सीटला, पाल भितींला चिकटते तसे चिकटून तसे घट्ट बसायचा प्रयत्न करत होतो. काही वेळा हळकुंडाला बंद डब्यात घालून हलवल्यावर त्याला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटत होतं. आणि अखेर आम्ही ‘पेंगॉंग त्सो’ ला पोचलोच.
इथे माझं प्रवास वर्णन संपून निरिक्षण + विचार मंथन सुरु झालं. 
1. मी महाराष्ट्रात जे काही गड किल्ले बघितले ते मला जास्त बोलके वाटले.
2. सह्याद्री म्हणे 65 दशलक्ष वर्ष जुना आहे आणि हिमालय 50. म्हणजे सह्याद्री हा हिमालयाचा काका नाही तर दादा आहे. सह्याद्री कणखर आहे. आणि हे डोंगर मला कधी हळवे तर कधी रागीट वाटले. असं म्हणायला हरकत नाही.
3. मी ही जी काही भ्रमंती केली तो भाग आपलाच आहे. पण कदाचित माझं अर्ध आयुष्य महाराष्ट्रात गेल्यानं असेल म्हणा मला ते उघडे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटत होते. 
4. ‘पेंगॉंग त्सो’ आहे खुप छान. प्रश्नच नाही. पण तरीही कुठेतरी कमतरता वाटत असल्या सारखं वाटलं. लेक जवळून बघताना या लेकपाशी मला शांत रम्य तळ्याकाठी बसल्यासारखं वाटत नव्हतं. तिथे एक गूढ शांतता होती. पुन्हा एकदा मला ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता’’ ओळ आठवली.
5. प्रवास सुरु करायच्या आधी जिथे जाणार तिकडची भौगोलिक परिस्थिती समजाऊन घ्यायलाच हवी. आम्ही ती समजाऊन घेतली तरी ‘कळतंय पण वळत नाही ‘’ असं काही वेळा होत होतं. 
6. प्रवासात वळणा वळणावर ‘’गाडी सावकाश, जपून चालवावी’’ या आशायाचे वाचनीय बोर्ड आहेत. मला काहींचे फोटो घेता आले. तर काही पटकन लिहून घेत होते. पण गाडी वळणं घेत असल्याने अक्षरही इतकं वळणदार आलं की नंतर वाचू म्हणता आपलंच अक्षर वाचता येईना.
7. इकडची माणसं कायम हसतमुख. ‘’मॅडमजी’’ आणि ‘’जी मॅडमजी’’ शिवाय वाक्याची सुरवात, शेवट होत नसे. 
8. ‘सोनम’ हे नाव तिकडे आवडतं आहे.
आपल्या भारतीय सेनेला त्रिवार मानाचा मुजरा. सगळे जुग जुग जियो रे. 
जाता जाता मैत्रीचा सल्ला.
शक्यतो हा भाग पन्नाशीच्या आत बघा. तर जास्त एन्जॉय कराल. मला इथे परत जायला आवडेल. पण ते थंडीला सुरवात होताना. बघू केव्हा योग येतो ते.
पण इथे जाल तर तिकडचंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा.
‘’Don’t be a gama in the land of lamas’’


लेह, लडाख, मॉनेस्ट्री, तुरतूक (turtuk) -२


लेह लद्दाख हा आपला भारताचाच भाग. सहज मनात आलं, कोणताही मनुष्य प्राणी आपल्या शरीरावर , स्वतःवर एकसारखंच प्रेम करतो. म्हणजे मला माझे पाय आवडत नाहीत म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा माझे केस कुरळे आहेत म्हणून मला आवडत नाहीत असं तर होत नाही ना. तशाच काहीशा भावना मला या लेह, लद्दाख आणि आम्ही ज्या ज्या भागात फिरलो त्याबद्दल वाटलं. मला इथल्या कधी न पाहिलेल्या माणसांबद्दल आपलेपणा वाटत होता. इतकं अदबशीर बोलणं, हसतमुख चेहेरे बघून मन सूर्यफुलासारखं फुलून जात होतं. मी भारतात तशी फारशी फिरले नाहीये खरं तर. पण हा माझाच देश. मग मला त्याचे कानेकोपरे माहीत असायलाच हवेत. आणि मला ते आपलेसे वाटले. इथे मला जे म्हणायचंय ते थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

आम्ही लामायुरुतली मॉनेस्ट्री बघितली. त्याच धर्तीच्या अनेक मॉनेस्ट्री बघितल्या. शांत, गंभीर वातावरण होतं सगळीकडे. मला अशा शांत ठिकाणी गेलं की रामदासांचं करुणाष्टक आठवतं. आता पाठ नसलं तरी त्यातली ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता ‘’ ही ओळ मात्र हटकून आठवते. याचं कारण मला कळलेलं नाही. 

आमच्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याच्या अव्याहत प्रवासात मुंबईत फारसे बघायला न मिळणारे भारतीय सेनेतले स्मार्ट, तरतरीत, जवान बघायला मिळाले. भारतीय सेनेचे ते ‘मिलिट्री ग्रीन’ रंगाचे ते ट्रक्स, जिप्सीतून जाणारे सेनेचे अधिकारी मी काहीवेळा हळूच तर काहीवेळा गॉगल लावला असल्याने एकटक बघत होते. असो. या मोठ्या प्रवासात एक दिवस तुरतुक साठी राखून ठेवला होता. यु पीन सारखे रस्ते, अगदी शेजारुन वहाणारी श्योक नदी. ही नदी आपल्याबरोबर खुप माती, वाहून नेत असल्याने तिचं पाणी काळसर, चिखल मिसळल्यासारखं वाटत होतं. काही दिवसांनी पाणी संथावलं की म्हणे हिचं पाणीही निळसार झाक असलेलं दिसतं. 

खारदुंग ला खिंडीत जाण्याचा रस्ता, तसंच जवळपासचे जे काही रस्ते बनवलेत त्याला तोड नाही. हे रस्ते बनवण्याचं श्रेय ब्रिगेडियर वोंबतकेरे यांना जातं. इकडे निसर्गाचं केव्हा बिनसेल ते सांगता येत नाही. बिनसलं असो की नसो. मनात आलं की येतात मोठमोठे दगड बागडत खाली. आपण आपला जीव चिमटीतच पकडलेला असतो. मूठ फार मोठी वाटते. तरीही इथे वहानांचा अव्याहत प्रवाह चालू असतो. पण दिवसाच. कारण ऊन जसजसं चढेल तसतसं कुठून ओहोळ वहात येतील आणि आपल्याबरोबर सोबत किती आणि कश्या दगडधोंड्याना घेऊन येईल याचा नेम नसतो. 

आम्ही तुरतुकला पोचलो. हे छोटसं गाव पाकिस्तानच्या ताब्यातून आपण 1970 ला घेतलं. पाकिस्तानी सीमेपासून फक्त सात किमी अंतरावर. इथे लोकं बल्ति भाषा बोलतात. चारही बाजून उंचच उंच डोंगर आणि मधे आमचं रहाण्याचं ठिकाण. बांधकाम सुरु असलेल्या हॉटेल तुरतुक मधे पाऊल टाकल्याबरोबर मोठ्या ताटात ओले, सुके जरदाळू ठेवले होते. एकाने ताज्या जरदाळूचा जुस दिला. त्याची चव अमृततुल्य होती. आम्ही दमलेले एका दमात ते अमृत पोटात टाकलं. मुन्नाभाई MBBS मधे मुन्ना म्हणतो ना की ‘’इसको एक बोतल ग्लुकोज चढाना’’ तसंच आम्हाला झालं. या पेयाची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत रहाते. आता तरतरीत झुरळं होऊन जो तो आपापला रहाण्याचा तंबू बघायला लागला. सगळ्या सुविधांनी युक्त असा तो तंबू आणि आजुबाजूची फुलं, हिरवाई बघून मी मनोमन भारतीय सेनेला दुवा दिला. इतकी सुंदर जागा, लोकं,मुलं, बाळं केवळ यांच्यामुळे बघायला मिळाली. 
इथे एक राजा आहे. त्याच्या महालाची पाक आर्मीने पार दुर्दशा करुन टाकली आहे. त्याचं नाव YBGO MOHD KHAN KACHO. आदल्या दिवशी छानसा डगला घालून आल्याने मला तो स्मार्ट वाटला. दुसर्या दिवशी त्यांच्या महालात गेले तर पार रया गेलेल्या अवस्थेत दिसला. गतकाळच्या वैभवाच्या खुणा बघितल्या. सोबत माहिती देणारा जेव्हा पाकिस्तान आर्मीचा उल्लेख करत असे तेव्हा मी या राजाच्या चेहेर्यावरचे भाव बघत असे. काहीही असो. गावची सगळी मंडळी खुश दिसली. मला तिकडे एक लायब्ररी पण दिसली. तीनशे पुस्तकं आहेत तिकडे. 
इथे दोन घरांच्यामधून स्वच्छ पाण्याचे ओहळ वहातात. त्यात मुलं/मुली आपले केस धुतात. आपली डोकी त्या ओहळाच्या पाण्यात भिजवायची. साबण लावायचा. पुन्हा ओहोळात आपलं डोकं खळबळायचं. मजाच वाटली. रोज अंघोळ करत नाहीत ते.

लेह..लद्दाख (लडाख)- १


दहा दिवस घरच्यांपासून लांब गेले होते. अगदी वरच्या टोकाला. लेह लडाख (लद्दाख) ला. खरं तर पाय बोबडं का होईना पण बोलत होते. काश्मीरची एकूण परिस्थिती बघता पोटात बाकबूक होत होतं. पण एकदा ठरवलं की ठरवलं या ठाम विचारामुळे माझा बोजा घेऊन इतर दहा जणांबरोबर मीही प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. सोमवारी श्रीनगरला सकाळी ११ वाजता उतरलो. याआधी हा भाग मी बघितला नसल्याने विमानातूनच सुरवातीला बघायला सुरवात केली. सिनेमातली काही चित्र डोळ्यासमोर होती. वरून तरी छान हिरवं गार दिसत होतं. अलगद खाली उतरलो. बाहेरचं तापमान २९ होतं. ‘किती साठवू दोन डोळ्यांनी’ अशी माझी अवस्था झाली होती. 
बस मधे बसलो. चक्रधारी बोलता बोलता म्हणाला. ‘’आज २८ दिन हो गये बंद को. ये अभी ५ अगस्त तक ऐसेही रहेगा’’ आपल्याला जोडून तीन दिवस आलेली सुट्टी सुखावून जाते. आणि आपण प्लॅन्स आखायला लागतो. सगळीकडचा शुकशुकाट बघून पोटात खड्डा पडला. हॉटेलवर गेलो. तिकडचा स्टाफ आनंदात दिसला. या बंद मुळे आणि आधी घडलेल्या काही भीतीदायक कारणांनी पर्यटकांनी श्रीनगरला लांब वळसा घातल्यानं हाता तोंडातला घास हिरावला गेला होता ना. आम्ही आलो तेवढीच हॉटेलमधे चहल पहल. 
संध्याकाळी हॉटेलच्या समोरच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर समोर बघितलं तर दल सरोवर. त्यातले छोटे छोटे शिकारे बघताना मला ‘जब जब फुल खिले’ मधला ‘’परदेसियोंसे न अखियाँ मिलाना’’ म्हणणारा शशी कपूर आठवला. तर कोणाला ‘काश्मीर की कली’ आठवला. ‘’तासाभरासाठी शिकाऱ्यात बसा. मीना बाजार पर्यंत फिरवून आणतो. ५० रुपये घेईन’’ या बोलीवर डुगडूगत एका शिकार्यात चार जण असे बसलो. एके काळी या सरोवराचं रूप किती देखणं असेल याची जागोजागी खुण पटत होती. हर हायनेस गायत्री देवी म्हातार्या झाल्या तरी सुध्दा सुंदर दिसायच्या, तसंच काहीसं या सरोवराबद्द्ल वाटून गेलं. आपण मात्र कधीही न सुधारण्याच्या कॅटेगरीतलेच. जाऊ तिथे खाऊन आपल्या खुणा ठेवणारे. पाण्यात पाण वनस्पतींशिवाय रिकाम्या कोकच्या, इतर पेयांच्या बाटल्या, लेज, कुरकुरेची पाकीटं तरंगत होती. पाण्यातून सैर करताना डाव्या आणि उजव्या बाजूने विक्रेते अजिजी करत काही वस्तू घ्यायला सांगतात. कोणी ‘’कश्मीरी वेशात फोटो काढून घ्या’’ असं म्हणत हातात फुलांचा गुच्छ देऊ पाहत. या सगळ्यातून वाट काढत काही बारीक सारीक खरेदी करत आम्ही परत हॉटेलवर गेलो. 
यापुढे आम्ही कसे आणि कुठे गेलो ते फार लांबण लावत बसणार नाही. मला कुठे काय वाटलं हे माझं मत सांगणार आहे. 
आम्ही विवेक नागवेकर यांच्या बरोबर गेलो होतो. ते १९८५ पासून ‘लेहवासी’ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मते ते लेहच्या प्रेमात नसून लेह त्यांच्या प्रेमात आहेत. आणि हे खरंही आहे. 
श्रीनगरहून आम्ही सोनमर्ग ला गेलो. तिथून जोझीला पास करून बाल्तर ...अमरनाथ परिसर करत घुमरी, कारगिल स्मारक बघून कारगिलला मुक्काम केलं. त्याच दिवशी आम्ही पूर्वी ‘तिकडच्या’ ताब्यात असलेला आणि आता ‘आपला’ असलेला HUNDERMAN चा भाग आणि आपली पोस्ट बघायला गेलो. खरं तर प्रवास आणि जेवण अंगावर आलं होतं. पण ही संधी कोण सोडेल बाबा? सगळे पोस्ट बघून, सेनेतल्या सावळ्या, उंच, स्मार्ट सैनिकाशी बोलून तरतरीत होऊन हॉटेलवर परतलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी निघून मुलबेकला डोंगरात कोरलेला बुद्ध बघितला. इथून पुढे जाताना ‘मूनलँड’ ला गेलो. हा परिसर म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग असावा तसा आहे. हा भाग बघायला गेलेल्या पर्यटकांनी तिकडे कचरा टाकला आहे. मला सगळ्यात आधी तोच डोळ्यात खुपला. 

Friday 16 March 2018

प्रशिक्षण



ग्रंथालय संचालनालयातर्फे पणजी, गोवा येथे महाराष्ट्रातून दहा ग्रंथपालांची Training under Capacity Building Programme of NML (National Mission on Libraries) for Library Personnel या साठी निवड झाली होती. सदर प्रशिक्षण RRRLF (Raja Rammohun Roy Library Foundation) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या आधी असेच प्रशिक्षण जानेवारी २०१८ मध्ये नासिक येथे झाले होते. हे प्रशिक्षण १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, संस्कृती भवन, पणजी येथे आयोजित करण्यात आले होते.
१८ फेब्रुवारी २०१८ रोजी आम्ही पणजी येथील हॉटेल जिंजर येथे दाखल झालो. या प्रशिक्षणाची आणि इतर नियोजनाची जबाबदारी असणारे RRRLF चे श्री. दिपांजन चटर्जी आणि श्री सुब्रतो नाथ यांनी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.
दिवस पहिला १९ फेब्रुवारी २०१८
सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ठीक १० वाजता आम्ही सर्व जण हॉटेल पासून जवळच असलेल्या संस्कृती भवन येथे जमलो.

 तेथे कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांनी आमचे आपुलकीने स्वागत केले. प्रशिक्षणासाठी गोवा तालुका लायब्ररीतील आणि सेन्ट्रल लायब्ररीचे कर्मचारी तसेच कोलकाता येथील नॅशनल लायब्ररीचे आणि सेन्ट्रल रेफरन्स लायब्ररीचे कर्मचारी मिळून आम्ही एकूण ५२ जण उपस्थित होतो.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सुरवातीला कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीचे क्युरेटर डॉ. कार्लोस फर्नांडीस, RRRLF चे श्री. अनिरबन बिस्वास, गोवा सेन्ट्रल लायब्ररीच्या ग्रंथपाल सुलक्षा कोलमुले, इग्नुच्या श्रीमती उमा कांजीलाल यांनी दीपप्रज्वलन करून उपस्थितांचे स्वागत केले.
त्यानंतर RRRLF चे श्री. अनिरबन बिस्वास यांचे जगभरातल्या वेगवेगळ्या ग्रंथालयात झालेले आणि भविष्यात होऊ घातलेले बदल याबाबत माहिती दिली. सुरवातीलाच त्यांनी ‘ग्रंथपाल’ या पेशाबद्दल अभिमान बाळगा असे सांगितले. ( Be Proud to be a Libarian). सध्याचं युग जाहिरातीचं असल्याने आपण करत असलेल्या कामाची जितकी जास्त जाहिरात करता येईल तितकी करा. यासाठी सोशल मिडीयाचा वापर करा.

 जाहिरातीबाबत बोलताना त्यांनी स्मिता पाटील यांच्या  ‘मंथन’ सिनेमाचं उदाहरण दिलं. त्यात हा सिनेमा गुजरातचे पाच लाख शेतकरी सादर करताना लिहिलं आहे. त्यामुळे तो सिनेमा लोकांच्या मनामनात जाऊन बसला. त्यामुळे जाहिरात केल्यावरच आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले.

 कारण सार्वजनिक ग्रंथालय काय किंवा कोणत्याही ग्रंथालयात फक्त पुस्तक देणे किंवा घेणे इतकेच काम नसते. जाहिरातीने योग्य परिणाम होऊ शकतो. तसेच सध्याच्या तंत्र युगात अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. जसे की स्टाफलेस लायब्ररी, यंत्रमानवातर्फे चालवण्यात येणारी लायब्ररी, सोयीचे असणारे फर्निचर, प्रत्येक पुस्तकाला RFID (Radio Frequency Identification) इत्यादी गोष्टी होत आहेत. सरते शेवटी जाताना आपण आज या प्रशिक्षणास जमलेल्या बावन्न लोकांशी मैत्री केली पाहिजे आणि त्यांच्याशी आपापसात विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे असे सांगितले. साधारणपणे पावणेदोन तासांनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीच्या अर्ध्या भागाची सांगता झाली.
नंतरचे व्याख्यान आय आय टी मुंबईचे प्रा. प्रदीप वर्मा यांचे होते. त्यांनी गुगल संदर्भात आणि ऑन लाईन माहिती कशी मिळवतात याबद्दल माहिती दिली. www चा अर्थ काय? IP address म्हणजे काय? http म्हणजे काय? cloud computing म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी काय असतात ते सांगितले. प्रा. प्रदीप वर्मा यांचे व्याख्यान ज्या ग्रंथालयांमध्ये संगणकीकरण झाले आहे आणि जे इंटरनेट वापरत आहेत त्यांच्यासाठीच उपयोगी होते. कारण आजही महाराष्ट्रातल्या काही खेडेगावात ग्रंथालयात संगणक नाहीत. त्यांचे सगळे काम हाती होत असते. अधे मध्ये दिवे जात असतात. त्यांना अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत हे व्याख्यान काही लोकांना क्लिष्ट वाटले. आणि ते साहजिकच होते. कारण व्याख्यान पूर्णपणे इंग्रजीतून झाले. त्यातून संगणकाचीही फारशी ओळख नाही.
पहिल्या दिवसाचे शेवटचे व्याख्यान इग्नू च्या प्रा. डॉ. उमा कांजीलाल यांचे होते. त्यांनी सोशल मिडिया, वेब २.२ म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय? याबाबत माहिती दिली. सोशल मिडियाच्या वापराने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. linkedin म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा? ब्लॉग म्हणजे काय? ग्रंथालयाच्या संदर्भात कोणकोणते ब्लॉग्ज आहेत त्याबाबत माहिती दिली. विकिपीडिया , मायस्पेस, friendster म्हणजे काय? निंज म्हणजे काय? ICT applications म्हणजे काय?


 यावर प्रकाश पाडला. हेही व्याख्यान उपयुक्त असले तरी जे ग्रंथालयासंदर्भात नव्याने या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना जास्त उपयोगी होते. जिथे संगणकच नसेल त्या ग्रंथालयात या गोष्टी नव्याने प्रादेशिक भाषेत आणि संगणक वापरणे काळाची गरज आहे जाणवून देऊन सांगितले पाहिजे. हेही व्याख्यान पूर्णपणे इंग्रजीत झाले.
अशा रीतीने प्रशिक्षणाचा पहिला दिवस पार पडला.

दिवस दुसरा २० फेब्रुवारी २०१८
आजचे पहिले व्याख्यान पुन्हा डॉ. उमा कांजीलाल यांचेच होते. आजच्या व्याख्यानाचा विषय होता metadata. Metadata means data about data. मेटाडाटाचे प्रकार ( descriptive, technical and structural ) आणि त्याचा उपयोग कोठे कोठे केला जातो ते दृक्श्राव्य माध्यमातून दाखवले. एका पुस्तकाचे कॅटलॉगिंग करताना पुस्तकाबाबत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती कशी द्यावी याची माहिती दिली. marc21 म्हणजे काय? २०१० पर्यंत बऱ्याच ग्रंथालयात कार्ड  इंडेक्स वापरले जात. त्यात लेखक, विषय, पुस्तकाचे नाव आणि इतर माहिती अंतर्भूत असे. पण संगणकावर एखाद्या ग्रंथाची बारकाईने नोंद कशी करावी याबाबत माहिती दिली.

व्याख्यानाचा विषय हा मोठमोठ्या संदर्भ ग्रंथालयात जास्त उपयुक्त असल्याचे जाणवले. हे व्याख्यानही इंग्रजीतून असल्याने थोडेसे क्लिष्ट वाटले. तथापि ग्रंथालय शास्त्रात रोज नवनवीन शोध लागत असल्याने या शास्त्रात रोजच मोलाची भर पडत असल्याने कालानुरूप परिस्थितीशी जुळवून घेणे क्रमप्राप्त आहे असे जाणवले. याविषयी गुगल वरून अधिक माहिती घेता येऊ शकते. या व्याख्यानात DUBLIN CORE म्हणजे काय ते नव्याने माहिती कळली. यावरून ग्रंथालयशास्त्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत आहे याची जाणीव झाली.

या व्याख्यानानंतर डॉ. पार्थसारथी मुखोपाध्याय यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचा  विषय होता – Open Knowledge movement: The background.
गुगल वरून कोणतीही माहिती शोधताना ती महिती बरोब्बर कशी शोधावी? तसेच URL, http, iso म्हणजे काय ते सांगितले. कोणतीही माहिती गुगल वर शोधताना अचूक शोधशब्द टाकल्यास काही सेकंदातच कशी बरोब्बर माहिती मिळते ते सांगितले.DOAJ (Directory of open access journal) बाबत दृक्श्राव्य माध्यमातून माहिती दिली. या व्याख्यानात गुगल आणि ग्रंथालयाचे सॉफ्टवेअर, डिजिटल लायब्ररी याबाबत माहिती दिली.
व्याख्यानाचे शेवटचे सत्र ग्रंथालयाची संगणक प्रणाली ‘koha’ बाबत प्रात्यक्षिक दिले गेले. यासाठी कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीच्या संगणक कक्षात नेले गेले. तेथे koha या ग्रंथालयाच्या open source प्रोग्रॅम मध्ये प्रत्यक्ष कसे काम करावे याबाबत प्रशिक्षणाची प्राथमिक माहिती दिली गेली.

दिवस तिसरा २१ फेब्रुवारी २०१८

पहिले व्याख्यान होते RRLF च्या श्री. अनिरबन बिस्वास यांचे. विषय होता Public Library services: Community service & partnership.

सार्वजनिक ग्रंथालयातर्फे वेगवेगळ्या विषयांवर माहिती असलेली पुस्तके गोळा करावीत. जशी की आरोग्य, कुटुंब, कायदेविषयक, घरासंबंधी, अर्थविषयक आणि अशा बऱ्याच विषयावर एकत्रित ग्रंथ जमा करावेत किंवा अद्ययावत माहिती कशी मिळेल ते पाहावे. याच विषयांवर ग्रंथालयातर्फे वेगवेगळी व्याख्याने आयोजित करावीत ज्या योगे लोकांचा ग्रंथालयावर दृढ विश्वास बसू शकेल. उदाहरणादाखल रुमानियातील ग्रंथालयाने शेतकऱ्यांना सबसिडी बाबत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीलंकेतील एका ग्रंथालयाने गृहिणींना घरगुती व्यवसाय करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. स्लोवेनियाच्या ग्रंथालयाने १२०० लोकांना नोकरी संबंधी मार्गदर्शन केले. किरगीस्तानातल्या ३०% टीबी ग्रस्त लोकांना रेड क्रॉस संघटनेच्या मदतीने ग्रंथालयाने उपचारासाठी कॅम्प आयोजित केला होता. या आणि अशा अनेक प्रकाराने आपण लोकांमध्ये ग्रंथालयाविषयी आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
या व्याख्यानानंतर पुन्हा डॉ. पार्थसारथी मुखोपाध्याय यांनी koha या संगणक प्रणाली विषयी तोंडओळख करून दिली.

या व्याख्यानानंतर koha या संगणक प्रणालीच्या प्रात्यक्षिकासाठी पुन्हा कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीच्या संगणक कक्षात गेलो. यावेळी koha प्रणालीत ग्रंथालयाची प्राथमिक माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र आणि कोलकात्याहून आलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी गोवा दर्शन आयोजित केले होते. बॉम जिजस चर्च, म्युझियम, आग्वादा फोर्ट आणि कलंगुट बीच येथे नेण्यात आले.
अशा रीतीने प्रशिक्षणाचा  तिसरा दिवस पार पडला.

दिवस चौथा २२ फेब्रुवारी २०१८
आजच्या दिवशी पुन्हा koha या संगणक प्रणाली बाबत प्रात्यक्षिकाद्वारे अधिक माहिती दिली गेली. तसेच सोबत koha बाबत एक सीडी आणि माहितीपत्रक दिले गेले. या प्रणालीबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांचे प्रतिनिधी ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट देऊ शकतात अथवा teamviewer वरून संपर्क साधू शकतात असे सांगितले.
दुसऱ्या सत्रात जमलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे गट पाडण्यात आले. प्रत्येक गटाला एक विषय देऊन त्यावरून काही पोस्टर्स आणि आपले विचार चित्रांच्या आधारे मांडायला सांगितले होते.

दिवस पाचवा २३ फेब्रुवारी २०१८
सकाळी ठीक १० वाजता श्री. तहा हाजिक यांचे यांचे 'संगणकाचे दिव्यांगांसाठी आधुनिक रूप' यावर व्याख्यान झाले. श्री. तहा हाजिक हे जन्माने अंध असूनही संगणकाचा वापर सहजतेने करत होते. यांचे कारण सांगताना ते म्हणाले की या २१ व्या शतकात टेक्नोलॉजीत रोजच्या रोज जे काही नवे शोध लागतात त्यामुळे मी येथे आज उभा आहे. यासोबत nonvisual डेस्कटॉप चे प्रात्यक्षिक दाखवले. windows10 मध्ये सुंदर आवाजात audio द्वारे माहिती सांगितली जाते. कोणतेही पुस्तक आपण यात ऐकू शकतो. यात आवाजावर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येते. ब्रेल लिपीचा कीबोर्ड त्यामानाने महाग असल्याने त्याचा अजूनही सगळीकडे सर्रास वापर होत नाहीत. याचवेळी त्यांनी आम्हाला तुमच्या बरोबरीने वागवा असा संदेश देणारी अतिशय सुंदर VDO क्लिप दाखवण्यात आली. ती पहावी अशीच असल्याने लिंक देत आहे.

या व्याख्यानानंतर कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीचे क्युरेटर डॉ. कार्लोस फर्नांडीस यांनी गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीची विभागाप्रमाणे माहिती सांगण्यास सुरवात केली. या ग्रंथालयाच्या बांधणीची सुरवात  २००७ पासून सुरु झाली. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. मनोहर पर्रीकर यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. ग्रंथालयाची इमारत सहा मजली असून संपूर्णपणे वातानुकूलित आहे. भरपूर प्रकाश योजना आणि प्रत्येक विभागाला ऐसपैस जागा आहे. सदर इमारतीचा तळमजल्यातील १५०० स्क्वेअर फुटाचा भाग ‘कला आणि संस्कृती’ विभागाला वापरण्यास दिला आहे. तळमजल्यावर ग्रंथालय बंद असल्यास ग्रंथ जमा करण्यासाठीचे स्वयंचलित मशीन आहे.

ग्रंथालयाच्या तळमजल्यावर मोफत वाचनालय आहे. तसेच काही मासिकेही वाचनासाठी ठेवली आहेत. ऐसपैस जागा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे वाचन हा एक सोहळा होऊन जातो.

संपूर्ण इमारतीतील तापमान सारखेच राहण्यासाठी ६५ डि-ह्युमिडीफायर्स लावले आहेत. पहिल्या मजल्यावर ब्रेल विभाग असून तेथे अंधांसाठी असलेले विशेष नकाशे आणि चित्र आहेत.
 दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त बालविभाग आणि ६३ इंटरनेट ब्राउझिंग मशीन्स आहेत.खास मुलांसाठी audio visual हॉल आहे. येथे मुलांसाठी खास सॉफ्ट toyes आहेत. खास लहान मुलांसाठी आकर्षक फर्निचर आहे. पुस्तकांची मांडणी भाषा आणि विषय अशी आहे.
ग्रंथालयाच्या तिसऱ्या मजल्यावर पुस्तक विभाग आहे, जो वाचकांसाठी खुला असतो. चौथ्या मजल्यावर दुर्मिळ ग्रंथ तसेच गोव्याच्या इतिहासावरील ग्रंथ ठेवले आहेत. पाचव्या मजल्यावर संदर्भ ग्रंथ विभाग असून सहाव्या मजल्यावर जुन्या, प्राचीन पोर्तुगीज ग्रंथाचे जतन केले आहे.
याशिवाय अजून काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या. जे जुने दुर्मिळ ग्रंथ आहेत ते वाळवी लागून खराब होऊ नयेत म्हणून acid फ्री बॉक्स आहेत त्यात काही पुस्तकं ठेवली आहेत. या एका बॉक्सची किंमत १२००/- इतकी आहे.
तसेच दुर्मिळ ग्रंथांच्या पानांचे जतन कसे करायचे यांचे आम्हाला येथे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. ज्या ग्रंथाचे जतन करायचे आहे त्याचे पानन् पान सुटे करायचे. सुरवातीला स्वच्छ पाण्यात ते पान बुडवून ठेवायचे. त्यानंतर ते पान lime water मध्ये बुडवले गेले. नंतर त्याला पाण्यातून काढून mylnex पेपर लावला जातो. हा पेपर खास ग्लुटेन फ्री मैद्याच्या खळीने त्या पानाला चिकटवला जातो. ही मैद्याची खळ तेथेच तयार केली जाते. या पेपरमुळे पुस्तकाचे पान घट्ट-मुट्ट होते. पानाच्या आतल्या बाजूला ९ जीएसएमचा (ग्राम्स पर स्क्वेअर मीटर) टिश्यू पेपरची पट्टी चिकटवली जाते. या पट्टी मुळे पुढे ग्रंथबांधणी करणे सोयीचे होते. 
या ग्रंथालयात असलेल्या प्रत्येक पुस्तकाला RFID चीप लावली जाते. त्यामुळे पुस्तक गहाळ होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
अशा रीतीने संपूर्ण ग्रंथालयाचा फेरफटका मारून झाल्यावर आम्ही सगळे संस्कृती भवनच्या हॉल मध्ये जमलो. तीन राज्यातून आलेल्या ग्रंथपालांपैकी एकेकाने प्रातिनिधिक स्वरूपाचे आभार प्रदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी श्री. किरण धांडोरे (ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य) हे जातीने उपस्थित होते. त्यांनीही समारोपाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या संपूर्ण पाच दिवसाच्या प्रशिक्षणाच्या काळात कृष्णदास शामा गोवा स्टेट सेन्ट्रल लायब्ररीचे क्युरेटर डॉ. कार्लोस फर्नांडीस आणि त्यांचे सर्व सहकारी आम्हा सर्वांना विशेष आस्थेने हवं नको बघत होते. या कालावधीत आम्ही खास गोव्याचे पदार्थ चाखले. (मडगणे, खतखतं, काप). 

शेवटी जाताजाता.... पु. लं नी म्हंटल्याप्रमाणे कोणतंही शिक्षण हे, देणारा- घेणारात मैत्रीच्या पातळीवर झाले तर ते ह्या हृदयीचे त्या हृदयी झिरपते. फार बौद्धिक झालं तर ते रुक्ष होतं. पण इथे रुक्षपणा यायच्या आतच  खानपान हजर व्हायचं. त्यामुळे आमचे या प्रशिक्षणाचे पाच दिवस काव्य शास्त्र विनोदात आनंदात गेले.