Thursday 3 May 2018

लेह, लडाख, पेंगॉंग त्सो

‘’जुले…जुले’’..म्हणजे नमस्कार. आमच्या भ्रमंतीचा शेवट होता ‘पेंगॉंग त्सो’. त्सो म्हणजे लेक. या लेकला थ्री इडियट्स मधे बघितलं होतं. याचं पाणी खारट आहे हेही माहित होतं. याच्या काठी रहायचंय ही कल्पनाही मला फारच रोमँटिक वाटली होती. 


आम्ही हळूहळू पेंगॉंग त्सो च्या दिशेने जात होतो. वाटेत अनेक वळणावळणाचे डोंगर पार करत होतो. लहानपणी गोष्टी वाचल्याचं आठवतंय की ‘’ दूर देशी एक राजा होऊन गेला. तो सात डोंगर, सात नद्या, सात समुद्र पार केल्यावर त्याच्या नगरी आपण पोचतो. इथे बाकी काही नाही पण सात डोंगर पालथे घातले. वाटायचं, आता सपाट रस्ता येईल, आणि तो यायचाही. पण एक वळण घेतलं की पुन्हा डोंगर चढायला सुरवात. वाटेत अनेक स्वच्छ पाण्याचे ओहळ तुकड्या तुकड्याने रस्ता धुवत होते. मैलोन् मैल रस्त्यात एखाद दुसरी प्रवासी गाडी नाही तर आर्मीचा ट्रक दिसे. रस्त्यात माणसं नाहीच दिसली. खुप पुढे गेल्यावर 20/25 माणसं रस्ता दुरुस्तीचं काम करत होती. नुकतेच चार दिवसांपूर्वी उजव्या बाजूच्या डोंगरावरुन काही दगड, माती, धोंडे आणि पाणी बागडत खाली आले आणि ‘इथे’ रस्ता होता याची खूण मिटवून गेले होते. आता ही रस्त्यावर गच्च बसलेली माती, दगड बाजूला करणे म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम. मशीन्स असली तरी बारीक सारीक कामं माणसंच करणार. इथं चार पावलं भरभर चाललं तरी आमची प्रचंड दमछाक व्हायची. पण इथल्या माणसांनी ते अवघड काम लवकरात लवकर पूर्ण केल्यानंच आमच्या सारख्या प्रवाश्यांना पुढे जाता आलं. 
आणि अखेर लांबून ‘पेंगॉंग त्सो’ चा त्रिकोणी तुकडा दिसलाच. जसजसं पुढे गेलो तसतसं लेकची व्याप्ती किती मोठी आहे ते दिसलं. आमची टेंपो ट्रॅव्हलर अनेक दगड धोंडे तुडवत पुढे जात होती. आम्ही सीटला, पाल भितींला चिकटते तसे चिकटून तसे घट्ट बसायचा प्रयत्न करत होतो. काही वेळा हळकुंडाला बंद डब्यात घालून हलवल्यावर त्याला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटत होतं. आणि अखेर आम्ही ‘पेंगॉंग त्सो’ ला पोचलोच.
इथे माझं प्रवास वर्णन संपून निरिक्षण + विचार मंथन सुरु झालं. 
1. मी महाराष्ट्रात जे काही गड किल्ले बघितले ते मला जास्त बोलके वाटले.
2. सह्याद्री म्हणे 65 दशलक्ष वर्ष जुना आहे आणि हिमालय 50. म्हणजे सह्याद्री हा हिमालयाचा काका नाही तर दादा आहे. सह्याद्री कणखर आहे. आणि हे डोंगर मला कधी हळवे तर कधी रागीट वाटले. असं म्हणायला हरकत नाही.
3. मी ही जी काही भ्रमंती केली तो भाग आपलाच आहे. पण कदाचित माझं अर्ध आयुष्य महाराष्ट्रात गेल्यानं असेल म्हणा मला ते उघडे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटत होते. 
4. ‘पेंगॉंग त्सो’ आहे खुप छान. प्रश्नच नाही. पण तरीही कुठेतरी कमतरता वाटत असल्या सारखं वाटलं. लेक जवळून बघताना या लेकपाशी मला शांत रम्य तळ्याकाठी बसल्यासारखं वाटत नव्हतं. तिथे एक गूढ शांतता होती. पुन्हा एकदा मला ‘’अचपळ मन माझे नावरे आवरिता’’ ओळ आठवली.
5. प्रवास सुरु करायच्या आधी जिथे जाणार तिकडची भौगोलिक परिस्थिती समजाऊन घ्यायलाच हवी. आम्ही ती समजाऊन घेतली तरी ‘कळतंय पण वळत नाही ‘’ असं काही वेळा होत होतं. 
6. प्रवासात वळणा वळणावर ‘’गाडी सावकाश, जपून चालवावी’’ या आशायाचे वाचनीय बोर्ड आहेत. मला काहींचे फोटो घेता आले. तर काही पटकन लिहून घेत होते. पण गाडी वळणं घेत असल्याने अक्षरही इतकं वळणदार आलं की नंतर वाचू म्हणता आपलंच अक्षर वाचता येईना.
7. इकडची माणसं कायम हसतमुख. ‘’मॅडमजी’’ आणि ‘’जी मॅडमजी’’ शिवाय वाक्याची सुरवात, शेवट होत नसे. 
8. ‘सोनम’ हे नाव तिकडे आवडतं आहे.
आपल्या भारतीय सेनेला त्रिवार मानाचा मुजरा. सगळे जुग जुग जियो रे. 
जाता जाता मैत्रीचा सल्ला.
शक्यतो हा भाग पन्नाशीच्या आत बघा. तर जास्त एन्जॉय कराल. मला इथे परत जायला आवडेल. पण ते थंडीला सुरवात होताना. बघू केव्हा योग येतो ते.
पण इथे जाल तर तिकडचंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा.
‘’Don’t be a gama in the land of lamas’’


No comments:

Post a Comment