Thursday 3 May 2018

लेह..लद्दाख (लडाख)- १


दहा दिवस घरच्यांपासून लांब गेले होते. अगदी वरच्या टोकाला. लेह लडाख (लद्दाख) ला. खरं तर पाय बोबडं का होईना पण बोलत होते. काश्मीरची एकूण परिस्थिती बघता पोटात बाकबूक होत होतं. पण एकदा ठरवलं की ठरवलं या ठाम विचारामुळे माझा बोजा घेऊन इतर दहा जणांबरोबर मीही प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. सोमवारी श्रीनगरला सकाळी ११ वाजता उतरलो. याआधी हा भाग मी बघितला नसल्याने विमानातूनच सुरवातीला बघायला सुरवात केली. सिनेमातली काही चित्र डोळ्यासमोर होती. वरून तरी छान हिरवं गार दिसत होतं. अलगद खाली उतरलो. बाहेरचं तापमान २९ होतं. ‘किती साठवू दोन डोळ्यांनी’ अशी माझी अवस्था झाली होती. 
बस मधे बसलो. चक्रधारी बोलता बोलता म्हणाला. ‘’आज २८ दिन हो गये बंद को. ये अभी ५ अगस्त तक ऐसेही रहेगा’’ आपल्याला जोडून तीन दिवस आलेली सुट्टी सुखावून जाते. आणि आपण प्लॅन्स आखायला लागतो. सगळीकडचा शुकशुकाट बघून पोटात खड्डा पडला. हॉटेलवर गेलो. तिकडचा स्टाफ आनंदात दिसला. या बंद मुळे आणि आधी घडलेल्या काही भीतीदायक कारणांनी पर्यटकांनी श्रीनगरला लांब वळसा घातल्यानं हाता तोंडातला घास हिरावला गेला होता ना. आम्ही आलो तेवढीच हॉटेलमधे चहल पहल. 
संध्याकाळी हॉटेलच्या समोरच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर समोर बघितलं तर दल सरोवर. त्यातले छोटे छोटे शिकारे बघताना मला ‘जब जब फुल खिले’ मधला ‘’परदेसियोंसे न अखियाँ मिलाना’’ म्हणणारा शशी कपूर आठवला. तर कोणाला ‘काश्मीर की कली’ आठवला. ‘’तासाभरासाठी शिकाऱ्यात बसा. मीना बाजार पर्यंत फिरवून आणतो. ५० रुपये घेईन’’ या बोलीवर डुगडूगत एका शिकार्यात चार जण असे बसलो. एके काळी या सरोवराचं रूप किती देखणं असेल याची जागोजागी खुण पटत होती. हर हायनेस गायत्री देवी म्हातार्या झाल्या तरी सुध्दा सुंदर दिसायच्या, तसंच काहीसं या सरोवराबद्द्ल वाटून गेलं. आपण मात्र कधीही न सुधारण्याच्या कॅटेगरीतलेच. जाऊ तिथे खाऊन आपल्या खुणा ठेवणारे. पाण्यात पाण वनस्पतींशिवाय रिकाम्या कोकच्या, इतर पेयांच्या बाटल्या, लेज, कुरकुरेची पाकीटं तरंगत होती. पाण्यातून सैर करताना डाव्या आणि उजव्या बाजूने विक्रेते अजिजी करत काही वस्तू घ्यायला सांगतात. कोणी ‘’कश्मीरी वेशात फोटो काढून घ्या’’ असं म्हणत हातात फुलांचा गुच्छ देऊ पाहत. या सगळ्यातून वाट काढत काही बारीक सारीक खरेदी करत आम्ही परत हॉटेलवर गेलो. 
यापुढे आम्ही कसे आणि कुठे गेलो ते फार लांबण लावत बसणार नाही. मला कुठे काय वाटलं हे माझं मत सांगणार आहे. 
आम्ही विवेक नागवेकर यांच्या बरोबर गेलो होतो. ते १९८५ पासून ‘लेहवासी’ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मते ते लेहच्या प्रेमात नसून लेह त्यांच्या प्रेमात आहेत. आणि हे खरंही आहे. 
श्रीनगरहून आम्ही सोनमर्ग ला गेलो. तिथून जोझीला पास करून बाल्तर ...अमरनाथ परिसर करत घुमरी, कारगिल स्मारक बघून कारगिलला मुक्काम केलं. त्याच दिवशी आम्ही पूर्वी ‘तिकडच्या’ ताब्यात असलेला आणि आता ‘आपला’ असलेला HUNDERMAN चा भाग आणि आपली पोस्ट बघायला गेलो. खरं तर प्रवास आणि जेवण अंगावर आलं होतं. पण ही संधी कोण सोडेल बाबा? सगळे पोस्ट बघून, सेनेतल्या सावळ्या, उंच, स्मार्ट सैनिकाशी बोलून तरतरीत होऊन हॉटेलवर परतलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी निघून मुलबेकला डोंगरात कोरलेला बुद्ध बघितला. इथून पुढे जाताना ‘मूनलँड’ ला गेलो. हा परिसर म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग असावा तसा आहे. हा भाग बघायला गेलेल्या पर्यटकांनी तिकडे कचरा टाकला आहे. मला सगळ्यात आधी तोच डोळ्यात खुपला. 

No comments:

Post a Comment