Saturday 4 August 2018

जन्मसावित्री/ अहेवपण

नमस्कारासाठी वाकले. जन्मसावित्री हो असा आशीर्वाद दिलेला ऐकला आणि याआधी कोणी बरं असा आशीर्वाद दिला होता ते आठवत होते. २०/२२ वर्ष मागे गेले. आमच्या लायब्ररीत जोडीनं येणारे बरेच आहेत. अगदी एक त्याच्या आवडीचं आणि एक तिच्या आवडीचं पुस्तक घेणारेही आहेत. काहींच्यात अहो तुम्ही माझ्या आवडीचा कथासंग्रह घेतच नाही. मला तुमची ती राजकारणावरची पुस्तकं आणि ते लेख वाचायचा कंटाळा येतो असंही म्हणणारी मेहुणं आहेत. काही जोडप्यातली एक जण निव्वळ सोबत म्हणून येणारी आहेत. अशाच जोडप्यांपैकी सौ. सु.वा. भट अशी सही करून सहीच्या खाली आडवी रेष मारून दोन टिंब देणाऱ्या भट काकू मला आठवल्या.
आमच्याच रस्त्यावर तू जागा घेतली आहेस ना मग ये ना एखाद दिवशी, असं नेहमी म्हणत. मी ही हो..हो..येईन..येईन म्हणत असे. भट काकूंच्या गोरेपणाचं वर्णन करायचं झालं तर कुठल्याश्या कादंबरीत एका मुलीचं वर्णन करताना लिहिलेले शब्द मला नेहमी आठवत. लाल भडक गुलाबाच्या पाकळ्या दुधात कुस्करल्या तर त्या पाकळ्यांचा रंग दुधात मिसळून जो गुलाबी रंग येईल अगदी तश्याच वर्णाच्या होत्या. हातात पाटल्या बांगड्यांसोबत मध्ये हिरव्या वर्खाच्या बांगड्या असायच्या. कपाळावर बरोब्बर मधोमध सिंगारचं लाल कुंकू चमकत असायचं. एकही केस वेणीच्या बाहेर येणार नाही इतपत तेल लावलेले काळे भोर केस होते त्यांचे. खांद्याला एक लांब पट्ट्याची पर्स कम पिशवी असायची. भट काकांना ऐतिहासिक पुस्तकांची प्रचंड आवड. लायब्ररीत आल्यावर पिशवीतून काकांना पुस्तकं काढून आपण स्वतः खुर्चीवर बसून राहत. त्यांचं हसणं खूप छान होतं. आवाज मात्र बोलताना कापायचा. बोलताना मधले शब्द काहीवेळा ऐकूच यायचे नाहीत. दोघांची वयं झालेली. काका तर जास्तच वयस्कर. ते दोघेच. त्रिकोण पूर्ण व्हायला तिसरं कोणीच आलं नाही. अशावेळी बायका आपल्या नवऱ्याची आपल्या पोरागत काळजी घेतात तसंच काहीसं यांचंही झालं होतं. आणि ते बघायलाही छान वाटायचं.
काका काकूंची पंधरा दिवसातून एकदा तरी फेरी व्हायचीच. पण त्यावेळी महिना झाला तरी ती दोघं फिरकली नाहीत. काकांना अधून मधून बरं नसायचं पण तरी तसे बरे होते. वाचन हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं. त्यांच्याच सोसायटीतल्या एकांकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली. काका गेल्याचं कळलं. अरे बापरे! काय हे? आता काकूंचं कसं होणार? अनेक प्रश्न मनात आले. दोघं होती तेव्हा जायला जमलं नाही. आणि आता त्यांना भेटायचं तर पावलं जड झाली माझी. हिय्या करून गेलेच. दार लोटलेलं होतं. घरात काकू पाटावर तांदूळ निवडत बसल्या होत्या. मी समोरच बसले. जरावेळ शांतता...काकू म्हणाल्या..बघ तुझा घरी येण्याचा योग असा होता. हे असताना नाहीच जमलं यायला. दोघींचे डोळे भरून आले. पाटावर पडलेलं डोळ्यातलं पाणी पदराच्या टोकाला पुसत निवडलेले तांदूळ डब्यात भरले. हे गेले म्हणून भूक लागायची थांबत नाही ना. अन्नमय कोश. खायला हवंच. शेजारी किती दिवस करतील. मग एक दिवस केली सुरवात. रात्री सोबत म्हणून शेजारची यायची. तिलाही म्हणाले मी झोपेन एकटी. लागलं तर तुम्ही आहातच. तीन रात्री नुसती पडून होते. झोप नाहीच लागली. चार दिवशी जरावेळ लागली. आता इतकी सवय झाली की यांच्या आजारपणात झालेल्या जागरणाची कसर पूर्ण करून घेतल्यागत मेल्यासारखी झोपते. मी त्यांचं ऐकत ऐकत घर बघून घेतलं. बाहेरची खोली कागदपत्रांनी आणि पुस्तकांनी भरलेली होती. जुनं समान होतं. लोखंडी कॉट होती. आरामखुर्ची उभी करून ठेवली होती. डोक्याकडचा कापडाचा भाग तेलकट काळा दिसत होता.
काकूंच्या मागोमाग तांदुळाचा डबा घेऊन आत गेले. स्वयंपाकघरात जुनी पितळेची भांडी आणि डबे गुमसुम दिसत होते. अनेक प्लास्टिकच्या छोट्या डब्या होत्या. एक वेगळाच मेथीचा वास येतो तसा वास येत होता. मला का कोण जाणे काकूंकडे चांगलं चार दिवस राहून साफसफाई करावीशी वाटत होती. स्वयंपाकघराने मोकळा श्वास घ्यावा असं वाटत होतं. जसं काही माझे विचार काकुना ऐकायला आल्यागत त्या म्हणाल्या आयुष्यभर यांची सावली होते. यांच्या आवडी निवडी पुरवणं हे माझं आवडीचं काम होतं. अगदी त्याच्या खाण्यापिण्या पासून ते वाचनापर्यंत सगळं त्यांच्या मनासारखं करण्यात माझा जन्म गेला गं. आता हे पसरलेलं घर मला आवरावंसंच वाटत नाही. या सगळ्यात त्यांच्या आठवणी आहेत. ही सुपारीची डबी, यात लिमलेटच्या गोळ्या असत असं एकेक डबा मला त्या दाखवत होत्या. मला भडभडून आलं. मी रडून घेतलं. त्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या असंच असतं बाई. अहेवपणी मरण आलं असतं तर हवं होतं गं. पण मग विचार करते की साधा चहा पण नीट करता यायचा नाही यांना. मी आधी गेले असते तर त्याचे हाल हाल झाले असते. माझाही जीव घुटमळला असता. तसं वृद्धाश्रम हा पर्याय होता पण हे आवरलं कोणी असतं? आता शांत हो. मला हातात कसलीशी बाटली देत म्हणाल्या हे मी घरी केलेलं तेल आहे. हे घेऊन जा. नहायच्या आधी केसांना नीट लाव. इतकं बोलताना त्यांचा आवाज कितीतरी वेळा कापला. मी कानात प्राण गोळा करून सगळं ऐकत होते. तास सव्वा तास बसून त्यांचा निरोप घेतला. नमस्कारासाठी खाली वाकले तर जुनं जातं मला बघत होतं. “जन्मसावित्री हो” असं म्हणल्या त्या. खाली उतरले आणि वर बघितलं तर त्या हात हलवत गॅलरीत उभ्या होत्या. पुन्हा ये असं काहीसं म्हणाल्या. मी अंदाज घेत हो म्हणाले.
काही दिवसांनी काकू लायब्ररीत आल्या. त्यांचं गोरेपण कोमेजल्यागत वाटत होतं. मला एक फोटो दाखवत म्हणाल्या कृष्णकमळाची एका वेळेस बारा फुलं आली. ती घेऊन सुरेखा फोटो स्टुडियोत गेले त्यांच्या सोबत हा फोटो काढला. हा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. पण सध्या आंधळं नक्षत्र लागल्याने तो मला सापडत नाहीये. नंतर काकू जास्त दिवस राहिल्याच नाहीत. एका अर्थी बरंच झालं असं वाटलं.
जन्मसावित्री हो असा आशीर्वाद मी परवा बऱ्याच वर्षांनी ऐकला आणि काकूच आठवल्या. आणि हो, तो तेलाचा वासही आठवला.


बास..बाकी काही नाही.

No comments:

Post a Comment