Thursday 14 March 2024

बांगड्या

 

त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी बांगड्यांच्या दुकानात गेले. निमित्त होतं माझ्या मुलीच्या संक्रांतसणाचं. तिला यावर्षी बांगड्या लुटायच्या होत्या. दुकान तसं छोटंसंच होतं. पण बांगड्यांचे रंग आणि प्रकार खूप होते. मला आवडतील अशा बांगड्या निवडीला वाव होता. माझ्यासाठी मी आमसुली रंगाच्या वर्खाच्या बांगड्या घेतल्या. अगदी हातात घालून सुद्धा बघितल्या.  त्या आमसुली रंगाकडे बघत माझ्या आजोळची आठवण झाली. मे महिन्यात आम्ही सगळी मावस, मामे भावंडं रहिमतपूरला जमत असू.

स्वयंपाकघरात आजी  नेहमीच चुलीपाशी बसलेली असे. आम्ही मुलं पुढ्यात ताट घेऊन अंगत पंगत करून बसायचो. सहज आठवलं. सुट्टीतल्या एके दिवशी दोन चुलींपैकी एका चुलीवर मोठ्या पोळपाटावर सांज्याची पोळी लाटत होती. लाटताना तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या मागेपुढे होत होत्या. त्यांची नाजूक किणकिण ऐकू येत होती, आजीच्या दोन्ही हातात मिळून आमसुली रंगांच्या साताठ बांगड्या होत्या.  दुसऱ्या चुलीवर भाजीसाठी तेल तापवत ठेवलं होतं. जवळच असलेल्या जमिनीतल्या उखळीत तिने दोन मिरच्या, चार लसणीच्या पाकळ्या ठेचायला टाकल्या.  त्या ठेचताना पुन्हा तोच बांगड्याचा आवाज. पण यावेळची आवाजाची लय वेगळी होती. मी वर्षानुवर्ष आजीचे हात त्याच आमसुली रंगाने भरलेले बघितले आहेत. तिला तोच रंग आवडायचा.

आजी म्हणायची, पोरी माहेरपणाला आल्या आहेत. त्यांना आवडतील त्या बांगड्या भरायला जाऊदेत. आम्ही मुली आणि आई, मावश्या शेजारीच असलेल्या कासाराकडे बांगड्या भरायला जायचो. तिथे वरपासून खालपर्यंत बांगड्यांची भिंत होती. शिवाय एकत्र गोल बांधून ठेवलेल्याही होत्याच. आईनं पण आम्सुलीच भरल्या. मला पण तशाच रंगाच्या हव्या होत्या. पण लहान मुलांच्यात तशा येत नाही म्हणून सांगितलं. तू पाकिजा पिच्चर बघितलास का तिनं विचारल्यावर मी मानेनेच नाही म्हंणलं. त्या पिच्चर मधल्यासारख्या भरते तुला. या बघ रेशमी पिवळ्या पिवळ्या. मला मुळातच बांगड्या घालायची हौस. त्यात कुठल्या तरी सिनेमात घातलेल्या नटीनं सारख्याच माझ्या बांगड्या आहेत म्हणल्यावर मला आनंदच झाला. मी एकेका हातात चांगल्या डझनभर बांगड्या भरल्या. पुढे जसा वयानुरूप हात मोठा झाला तशा माझ्या आवडत्या रंगाच्या बांगड्या मला मिळाल्या. आजी कडून आईला आणि आईकडून मला ही रंगाची आवड झिरपली होती. कणिक भिजवताना आई उजव्या हातातल्या बांगड्या जितक्या घट्ट बसवता येतील तितक्या मागे सारायची. नाहीतर बांगड्या पीठमय होतील. तरीही त्यातली सगळ्यात पुढे असलेली बांगडी यायचीच पुढे.

एकदा फोटो काढायला स्टुडियोत गेलो होतो. माझ्या हातात हिरव्या वर्खाच्या होत्या. आम्हाला आमचे हात फुली केल्यासारखे ठेवायला सांगून फोटोग्राफर फोटो काढणार तेवढ्यात मी हाताची फुली सोडून माझ्या बांगड्या मनगटापाशी आणल्या. हलू नकोस गं असं फोटोग्राफरनं म्हणल्यावर , मग बांगड्या नीट नाही ना दिसणार म्हणून पुढे केल्या असं मी त्याला म्हणाले. तो फोटो आजही बघताना हा संवाद आम्हा सगळ्यांना आठवतो.

 

आईच्या हातात कायम काचेच्या बांगड्यांमध्ये दोन बिलवर असायचे. ती पाटल्या कधीतरीच घालत असे. दिवाळीत सगळ्यात मागे पाटल्या त्यानंतर दोन काचेच्या, पुढे दोन दोन बिलवर घातलेले आईचे मौ सूत हात आम्हाला तेल लावायचे तेव्हा तिच्या बांगड्यांच्या किण किण आवाजात ब्रह्मानंदी टाळी लागायची.

मला वेगवेगळ्या बांगड्या जमवायचा छंद आहे. त्यात खास करून काचेच्या आणि लाखेच्या बांगड्या मला आवडतातच. पण आमच्या घरात जेव्हा एका बंगाली कुटुंबाशी नातं जोडलं गेलं तेव्हा मला शंखाच्या बांगड्याही आवडायला लागल्या. पण त्या बांगड्या फक्त लग्न झालेल्या बायकाच घालू शकतात असं कळलं. शुभ्र पांढऱ्या कोरीव काम केलेल्या शंखाच्या बांगड्या सगळ्यात मागे , त्याच्यापुढे लाल चुटूक बांगडी. कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. शिवाय या लाल बांगडीच्या पुढे एकेक सोन्याचं कडं. तेही मा शारदा बाला डिझाईनचं. शंखाच्या बांगड्या शरीरातील उष्णता कमी करते शिवाय एकूणच बांगड्यांच्या घर्षणाने रक्ताभिसरण सुधारतं अनेकांकडून ऐकलंय आणि वाचलंय पण.

लहान असताना आम्हा मुलीना अजून एक नाद होता. आम्ही मातीतून बांगड्याचे तुकडे शोधून जमवत असू काचापाणी खेळायला. चांगल्या दोन मोठ्या वाट्या भरून काचा जमवल्या होत्या. त्या एकदा बाबांना दिसल्या. आणि आम्हाला शाब्दिक फटका बसला. बाबा म्हणाले हे असलं काहीतरी खेळताना एखादा तुकडा जरी फरशीवर राहून गेला आणि बांगडीची काच पायाला लागली तर काय करायचं. टाकून द्या ते. काचा जमवण्याच्या नादात एकदा आईला म्हणूनही गेले की आई, तुझी बांगडी फुटली किंवा पिचली तर टाकू नकोस आम्हाला दे. आईने आम्हाला तिची नाराजी कृतीतून दाखवली. पिचली वरून आठवलं की काचेच्या बांगडीला जर चीर गेली तर तिचा आवाज वेगळा येतो. मला सुरवातीला कळत नसे की बांगडी पिचली आहे ते कसं ओळखतात. काही दिवसांनी एका लग्नात बांगड्या भरताना भरणारी एकेक बांगडी अंगठा आणि तर्जनीत पकडून उडवल्या सारखं करे.

जयपूर ट्रीप मध्ये मी लाखेच्या बांगड्या आणल्या होत्या. बांगडीवर आरशांचे चौकोनी तुकडे लावले होते. बेडरूम मध्ये पूर्वेकडून सकाळी उन्हाची उन्हाची तिरीप येते. मी नेमकी जिथे तिरीप येते तिकडे बसले. उन्हाची तिरीप बांगड्यांवर पडली  आणि माझी खोली कवडश्यांनी भरून गेली. जणूकाही छतावर चांदण्याची गर्दीच. खोली जास्त उजळून गेली. एकदा अशाच लाखेच्या पण बारीक खडे लावलेल्या बांगड्या माझ्या मैत्रिणीनं देवीचा प्रसाद म्हणून दिला. मी त्या जवळ जवळ महिनाभर हातात घातल्या. एकदा भाकरीचं पीठ मळत असताना मला पिठात काहीतरी चमकलं. बघते तर बांगडीतला खडा होता. मनात आलं गेला महिनाभर या बांगड्या हातात आहेत. यातले किती खडे कोणा, कोणाच्या पोटात गेले असतील काय माहित.

काही वर्षांपूर्वी भर उन्हात रायगड उतरून जरा खालच्या पायरीवर विसावतो तोच मागून आवाज आला की उन्हाच्या झळा लागल्या असतील. मडक्यातलं थंड ताक पिणार का..मी मागे वळून बघितलं तर एक एक आजी एका काळ्या रंगाच्या मडक्यातलं ताक ग्लासात ओतत होती. मधेच तिने डोक्यावरचा पदर सारखा केला. तिच्या एका हातात दोन डझन मोरपिशी बांगड्या गच्च बसल्या होत्या. तिचे ते सुरकुतलेले  दोन्ही बांगडी भरले हात मला हातात घ्यावे वाटले. मी घेतलेही असते. पण तेवढ्यात ताक प्यायला गिऱ्हाईक आलं म्हणून.  मी तिला विचारलंच की इतक्या बांगड्या घालून तुम्हाला चैन कसं पडतं. त्यावर अगदी पातेलं पसरून हसली. म्हणजे तोंडात एकही दात नव्हता. ती म्हणाली गळ्यात डोरलं आणि हातात काकणं शोभा असते. मला तर खूप वर्षांची सवय आहे. आता या इतक्या उन्हात बांगड्यांचा चटका बसतो. पण हाताला सवय आहे.

एकदा एका गडावर वस्ती करायची होती. ज्यांच्याकडे आम्ही वस्तीला होतो त्यांना मदत म्हणून मी चुलीपाशी पिठलं करायला बसले. घरची बाई मोठ्या परातीत भाकऱ्या थापत होती. तव्यावरची भाकरी एका बाजूने झाली की ती भाकरी चुलीतल्या विस्तवावर उभी ठेवत होती. चुलीची धग सर्वांगाला लागत होती. तिथे हाताला तर लागणारच. प्रत्येकवेळी भाकरी फुगायला विस्तवावर ठेवली की ती एका मोठ्या पातेल्यात असलेल्या पाण्यात अर्धे हात बुडवत असे. हे असं का विचारायच्या आत ती म्हणाली, या धगीमुळे काचेच्या बांगड्या लई तापतात. असा चटका बसतो ना..मग या गार पाण्यात हात बुडवते. मग जरा गार वाटतं. 

नव्या बांगड्या भरताना हात कधी रिकामा, भुंडा करायचा नसतो. एक जुनी बांगडी ठेऊन नव्या भरायच्या आणि नंतर जुनी बांगडी वाढवायची असं एकदा आजीनं सांगितलं होतं. फार पूर्वी म्हणजे लग्न आधी वाचलेल्या दीर्घकथेतल्या काही ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. ती म्हणते.....माझ्या हातातल्या या दोन जुन्या बांगड्या , जरी त्यावरचा वर्ख गेला असला तरी मला माझ्या आयुष्यात केलेल्या कष्टांची आठवण सतत जागी ठेवतात. आज जरी मी पैशांच्या राशीत असले तरी मी आणि ह्यांनी केलेल्या कष्टांचं चीज झालं. त्यावेळी सोन्याच्या चार बांगड्या विकून आज हा पसारा वाढवू शकले.  हातात फक्त काचेच्या बांगड्यांसोबत यांची मला आणि माझी यांना भक्कम साथ होती. त्याच वेळच्या या दोन बांगड्या मी आजही प्राणपणाने जपल्या आहेत. जरा बरे दिवस आल्यावर यांनी मला  सोन्याच्या बांगड्या आणल्या. मी पुन्हा सोनेरी वर्खाच्या बांगड्या भरल्या. पण या जुन्या नाही काढल्या. मला त्या सोन्याच्या बांगड्यांपेक्षा प्रिय आहेत. देवाच्याही या बांगड्या जपण्याचं मनात असणार. कारण इतके कष्ट करूनही या शाबूत आहेत. मुलं हे सांगितल्यावर हसतात. हसोत. पण माझी या बांगड्यांवर श्रद्धा आहे. देव न करो पण पुढे मागे या बांगड्या वाढवल्या तर त्याचे तुकडे पण मी जपून ठेवेन. आणि माझ्या शेवटच्या प्रवासात त्यांना माझ्या सोबत ठेवा असं मुलांना सांगेन.  

तर अशी ही बांगडीची कथा. सांगण्यासारखं अजून खूप आहे पण आता थांबते.


No comments:

Post a Comment