Thursday 14 March 2024

आठवणींचं कडबोळं

  

पिंजर लावायला म्हणून आरशासमोर उभी राहिले. अनामिकेने पिंजर लावत असताना मनगटाखाली भाजल्याच्या चंद्रकोरी उमटलेल्या दिसल्या आणि आठवलं लेक घरी जेवायला घरी आली होती. तिच्या घरच्या बाईच्या हाताच्या चवीचा कंटाळा आल्यानं तिला आईच्या हातची अंबाडीची भाजी नि भाकरी खायची होती. भाकरी करताना खोलगट तव्यावर भाकरी टाकून झाल्यावर पाणी फिरवताना अनेकदा मनगटाखाली चटके बसले होते.

पूजा करताना किंवा एखाद दिवशी जास्तीची कामं करताना या भाजक्या चंद्र्कोरी बघितल्या की मला आजीची आठवण होतेच होते. तिच्या बांगडी भरल्या हातावर कायम या काळसर चॉकलेटी भाजक्या चंद्रकोरी असत. आजीच्या कामाविषयी आई अनेकवेळा भरभरून बोलते. दिवसाला दररोज ४०-५० भाकरी चुलीवर भाजाव्या लागत. आणि सगळा स्वयंपाकही असायचाच. तशात ती जर गरोदर असली तर मग ते चुलीपाशी अवघडून बसणं, तिने पाय पसरले की पोटातल्या जीवालाही जरा पाय पसरायला मिळे. इतक्या भाकरी भाजून, बाकीचा स्वयंपाक करून तिची अन्नावरची वासना जात असे. तिची वासना गेली असली तरी पोटातल्या जीवाचं काय? मग अशा वेळेस ती चार पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घेत असे. कोनाड्यात एका टोपलीत वाळक्या मिरच्या असत त्यातल्या दोन मिरच्या घेत असे. आणि भाकरी झाल्यावर त्याच खोलगट तव्यावर चमचाभर तेल घालून ठेचलेली लसूण, मिरची घालत असे. त्यातच  भाकरीवर पाणी फिरवायला जे भांड घेतो त्यात जे पीठ जमा होई ते पिठाच्याच बोटांनी ढवळून तव्यावरच्या फोडणीत घालत असे. नुसत्या लसूण, मिरचीच्या वासानेही पोटातला जीव आनंदाने उड्या मारतो असं तिला वाटत असे. खरी गोष्ट अशी होती की तिला भूक लागलेलीच समजत नसे. एका वाफेत ती ज्वारीच्या पिठाची उकड शिजत असे. तिथे जवळच असलेल्या ताटलीत ती सगळी उकड काढायची त्याला मधोमध एक विहीर करून त्यात कच्चं तेल घालून सावकाशपणे बोटाने चाटत खायची. वर ताक प्यायचं. झालं एका गर्भारशी बाईचं जेवण.

याशिवाय शेतातून आलेला भुईमूग असो, चिंच असो की तूर असो. एकादशीच्या आधी दाण्याचं कूट संपलं असलं तर भुईमुगाच्या शेंगा त्यांची नाकं ठेचून त्यातले दाणे काढायचे. चिंच आलेली गावात लोकांना कशी कळायची कोण जाणे. रोज चार/ पाच जणं तरी चिंचेबद्दल विचारायला येतच. मग जरा सवड मिळाली की खल उपडा घालून त्यावर लाकडी दांडक्याने चिंचेवर घाव घालून चिंचोके आणि शिरा/ रेषा वेगळे काढून चिंच फोडून ठेवायची. आई, मी , मावश्या सुट्टीत गेलो की आम्ही मदत करत असूच. पण तिच्या कष्टांना पारावर नव्हता.

आज मिक्सर , फूड प्रोसेसर वापरताना आजीचे हात आठवतात. आपल्या वाळक्या , शुष्क तरीही तळव्याला मऊ असलेले हात आठवतात. गॅस गिझरचं पाणी अंगावर घेताना, बंबातलं कढत कढत पाणी घंगाळातून अंगावर घेताना पाण्याला येणारा एक वेगळा वास अजूनही नाकात जाणवतो.

माझ्या एका मित्राने एके ठिकाणी लिहिलं होतं की वारसा नावाची एक नितांतसुंदर चीज असते आपल्या आयुष्यात. हा वारसा काय असतो? तर आपल्या आई वडलांकडून आलेल्या गुण दोषांचा, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींचा, गाण्याचा, वाचलेल्या पुस्तकांचा, आलेल्या अनुभवांचा हा वारसा आपल्याला भूतकाळात घट्ट पाय रोवून उभं रहायला शिकवतो. आपल्या पुढच्या आयुष्य या वारशाची एक घट्ट विणीची गोधडी तयार  तयार होते. ही गोधडी आपल्यावर कायम पांघरलेली असते.

एक दिवस दुपारी घरी असताना ओळखीची बेल वाजली. बघते तर आई दारात उभी होती. आई घरात आली. तिने माझ्या हातात आठ रुपये दिले आणि म्हणाली हे आठ रुपये मीनूच्या पिगी बँकेत टाक. रिक्षाने येणार म्हणून हातात ठेवले पण रिक्षाच मिळाली नाही. घोटभर पाणी पिऊन आई म्हणाली मी जरा आडवी पडते गं. दमलेय उन्हातून. आई एखाद्या लहान मुलासारखी कुशीवर झोपली होती. लहान मूल अत्यंत विश्वासाने आपल्या आईजवळ झोपतं तशीच ती झोपलेल्या मिनू जवळ आडवी झाली. चेहरा दमलेला होता. बाबा गेल्यापासून आई आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष देत नाही असं एकदम जाणवून पोटात खड्डा पडला. मुलगी म्हणून मला यात दुर्लक्ष करून चालणार नाही. एकदम अपराधी वाटलं. तासाभराने आई आणि तिची नात दोघीही उठल्या. झोप पुरी झाल्यामुळे असेल पण दोघी ताज्यातवान्या दिसत होत्या. आई टेबला जवळ येऊन बसली. मी पोळ्या करत होते. मला वाटलं की आई आता पोळपाट लाटण्याचा ताबा घेते की काय..पण तसं काही झालं नाही. म्हणाली भूक लागली आहे. दोन दिवस नीट खाल्लंच नाही. बरं वाटत नव्हतं. शेवटी आज वाटलं आता तुझ्याकडे आजचा दिवस राहावं. आराम करावा. मला पोटात प्रचंड तुटलं. म्हणाले अगं तरीच फोनवर तुझा आवाज ओढलेला वाटला. ती नुसतीच हो म्हणाली.

मी एका छोट्या ताटलीत गरम पोळी तेलाचं बोट लावून वाढली. एका छोट्या वाटीत काल रात्री केलेला सुधारस वाढला. कडेला तूप वाढलं आणि आईसमोर ताटली ठेवली. आईनं कुठलासा श्लोक म्हणून जेवायला सुरवात केली. पहिला घास खाल्यावर लगेच म्हणाली छान खमंग झालीये पोळी. सुधारसा सोबत मस्तच लागतीये. घरातल्या बाईला अशी आपण केलेल्या पदार्थांची पावती किती लोकं पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या देत असतील माहित नाही. देत असतील तर छानच. पण देत नसाल तर द्याच. मग पुढे काय जादू होते ते अनुभवा. जेवण झाल्यावर अन्नदाता सुखी भव म्हणत उठली. म्हणाली आज पोटात गोविंद गोविंद वाटतंय. मला तर माझंच पोट भरल्या सारखं वाटत होतं. जी आपली आई मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा बरोबर गरम गरम पोळी करून देत असे तिला आज आपण गरम गरम पोळी करून वाढली याचं कोण समाधान वाटलं. सगळं आटपून आत गेले तर आईचा परत डोळा लागलेला. आणि तिची नात तिला डोक्यावर, कपाळावर जो..जो..असं म्हणत थोपटत होती. मित्र म्हणतो ती वारशाची वीण हीच.

एके दिवशीची गोष्ट. कामं अगदी पाठीला पाठ लावल्यासारखी आली होती. साय तळाला गेली होती. ती सायीच्या भांड्यात काढायची होती. कणिक भिजवायची होती. मुलगी शाळेतून यायच्या आधी तिच्या आवडीचा कोथिंबीरीचा पराठा करायचा होता. साय काढून दुधाच्याच भांड्यात कणिक काढली. दुधातल्या सायीमुळे भांड्याला एक प्रकारचा ओशटपणा येतो. आपण जर दुधाच्या भांड्यात कणिक भिजवली तर तो सगळा ओशटपणा कणकेत मिसळून दुधाचं भांडं एकदम स्वच्छ होतं. आणि इतर भांड्यांना तो ओशटपणा लागत नाही. हा वारसा पणजी, आजी आणि आईकडून माझ्याकडे आलेला.

तुपाच्या बेरीचीही तीच गोष्ट. तूप कढवून दोन दिवस झाले होते. तुपाची बेरी काढून ती फ्रीज मध्ये ठेवली होती. एक दिवस सकाळी सकाळी चुलत सासरे आले. नाश्त्याला एक खमंग थालीपीठ दिलं. नको नको म्हणत अगदी आवडीनं खाल्लं. थालीपिठाचा समाचार घेऊन झाल्यावर त्यांनी हे कसलं थालीपीठ आहे विचारलं. म्हणाले बेरीचं. बेरीत ज्वारी आणि तांदुळाचं पीठ घातलं. दोन कांदे, भरपूर कोथिंबीर घातली. तिखट मीठ घालून ते एकत्र करून त्याची ही थालीपीठं केली. बेरी आणि त्यातला तुपाचा अंश दोन्ही वाया न जाता उपयोगाला आले. हा चवींचा आणि निगुतीचा वारसा.

आपलं घर, आपल्या घराच्या चार भिंती त्यांचे कोपरे, थोडक्यात आपली वास्तू कायम आनंदी रहायला हवी असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. जुनं, नको असलेलं समान, कागद पत्र वेळ मिळेल तेव्हा फाडून टाकावं. मला असं केल्यावर माझं घर मोकळा श्वास घेतंय असं वाटतं. सुट्टीत आजोळी दिवाळीत एकदा पहाटे पहाटे उठले आणि चहा प्यायला स्वयंपाकघरात गेले. तिथे पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या  उजेडात आजी चहाची तयारी करत होती. चुलीवर नजर गेली आणि बघते तर आदल्या दिवशी रात्री भाकरी करत असताना पिठमय झालेल्या चुलीचा मागमूस नव्हता. आम्ही मुलं जेवून वरच्या माडीत गेलो. पण आजीने सगळ्यांची जेवणं झाल्यावर चुलीतले निखारे काढून, चूल शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली होती. हळद कुंकवाची बोटंही दिसत होती त्या पेट्रोमॅक्सच्या दिव्यात.

मला मी जेव्हा माझी गॅसच शेगडी स्वच्छ पुसते तेव्हा ती सारवलेली चूल नेहमी डोळ्यासमोर येते. आपला स्वयंपाकघराचा ओटा, ओट्या खालचे ड्रॉवर, सिंक, सिंक खालची जागा हे महिन्यातून एकदा. खरं तर दोनदा सगळी भांडी, चमचे, कप, बाहेर काढून स्वच्छ करावेत. कोपऱ्यातून आणि कडेने दोन तीन लवंगा ठेचून आणि मिरी ठेवाव्यात. त्यावासाने झुरळांची, मुंग्यांची तिथपर्यंत यायचं नाही याची लक्ष्मणरेषा ठरून जाते. सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा असेल आणि ओल असेल तर हमखास झुरळं, गोम, घोण यांची छुपी वस्ती असतेच असते. वर्षातून तीनवेळा हर्बल पेस्ट कंट्रोल करून घ्यावं. स्वयंपाकघर हे आपल्या संपूर्ण वास्तूचं हृदय असतं. ते जर ठणठणीत असेल तर घरातल्या सगळ्यांची प्रकृती उत्तम राहील यात शंकाच नाही.

पाणी हे जीवन आहे हे आपण लहानपणी शिकलोच आहोत. आज बातम्यांमधून, सोशल मिडिया वरून आपण गावात पडलेला दुष्काळ बघू शकतो. शहरात त्याची इतकी झळ बसत नसली तरी पाण्याचा वापर हा आपल्या कडे असलेल्या मौल्यवान गोष्टीसारखा केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होतोय. पावसावर आपले पुढचे काही महिने अवलंबून असतात. पालेभाज्या धुतलेलं पाणी आपण आपल्या घरगुती बागेत वापरू शकतो. नळाची धार कमीच ठेवावी. दात घासत असताना असताना अनेकजण नळ सुरु ठेवून दात घासत असतात. एक दिवस ते पाणी मोजून बघा किती वाया जातं ते. कुकर लावला असेल तर तळाला असलेलं गरम पाणी ओशट, तुपकट भाडी धुण्यासाठी किंवा मिक्सरचं भांडं धुण्यासाठी करू शकता. इंधन आणि पाणी दोन्ही वाचेल.

 दिवसातून एकदा आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यातून एक मायेची नजर फिरवा. त्यावेळी चांगले विचार मनात आणा. वास्तू तर काय तथास्तु..तथास्तु म्हणतच असते.

No comments:

Post a Comment