Thursday 14 March 2024

गजरा

 आता अजून एक मुलींच्या, बायकांच्या आवडीची गोष्ट सांगते. एका लग्नाला मुहूर्ता नंतर लहान लहान मुलं , मुली स्टेजवर फुलांच्या पाकळ्या गोळा करत होती. त्या लग्नात अक्षता नावापुरत्याच टाकून नवरा नवरीच्या जवळपास उभं असणाऱ्यांना मिक्स फुलांच्या पाकळ्या दिल्या होत्या. ती मुलं पाकळ्या गोळा करून एकमेकांच्या अंगावर उधळत होती. त्यात एक मुलगी मात्र म्हणाली की, माझ्या डोक्यावर हे टाकू नका. माझा गजरा खराब होईल. मला लग्नात सगळ्यांचं निरीक्षण करायला खूप आवडतं. आपला वेळही छान जातो त्यात. नवर्याच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. नवरा त्याच्या मित्र मंडळीत असल्यामुळे  मी एकटीच स्टेज समोरच्या खुर्चीत बसून होते. मी पण कोणे एकेकाळी केलेला लहान मुलांचा वेडेपणा एन्जोय करत होते. त्या मुलांच्यात हेयर band सारखा गजरा लावलेली एक मुलगी होती. अगदी जसा लहान मुलांना आवडतो तसाच मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा लावला होता. खेळताना मधेच गजरा जागेवर आहे का नाही ते चाचपून बघत होती. तिच्यात लहानपणीची मी बघत होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावर गुलबक्षीची खूप झाडं होती. मी त्याची अनेकदा फुलं घरी आणत असे.  फुलांची देठं एकमेकात विणून माझी मावशी त्याची सुंदर गजरा करत असे. चंद्रकोरीसारखा दिसे गजरा. मावशीच्या काळ्या, लांबसडक वेणीवर हा गजरा अगदी उठून दिसायचा. मला हा गजरा खूप आवडायचा. पण माझा बॉबकट असल्यानं मला हा गजरा घालताच यायचा नाही. शेवटी गजरा घालायला मिळावा म्हणून  मी ठरवून केस वाढवायला सुरवात केली आणि शाळेजवळची रोपं जाऊन तिथे बांधकाम सुरु झालं. त्यानंतर पुढे किती तरी वर्षांनी मला अशीच झाडं कोकणात दिसली. पण मावशीसारखा गजरा काही कोणाला जमला नाही.

आमच्या वर्गातली एक मुलगी एक दिवस मोत्याचा गजरा वाटावा असा तगरीच्या कळ्यांचा देठं काढून ओवून केलेला गजरा लावून आली होती. तिच्या काळ्याभोर   केसात जणू मणीच ओवल्यासारखे दिसत होते. झालं...मलाही तसाच गजरा हवासा वाटू लागला. पण आमच्याकडे तगरीचं झाड नव्हतं. पण शेवटी माझी तगरीचा गजरा घालायची इच्छा पूर्ण झालीच. एक दिवस माझ्या वर्गातल्या मैत्रिणीनंच मला रुमालात बांधून तगरीच्या कळ्या आणून दिल्या. म्हणाली..या घे बाई कळ्या. आणि घाल करून गजरा. मला कधी एकदाची मी घरी जाते आणि गजरा करते असं झालं. मी घरी गेले. हात पाय धुऊन एका ताटलीत कळ्या ओतल्या. मी कात्रीनं कळ्यांची देठं कापायला लागले. तेवढ्यात आई शाळेतून आली. तिने हा काय प्रकार आहे विचारलं. मी सगळं सांगितल्यावर मुक्या कळ्या तोडू नयेत गं मंजिरी. झाडालाही वाईट वाटू शकतं. मला ते मनापासून पटलं. आई म्हणाली..आज असं केलंस. पण परत असं करू नकोस. कर त्याचा गजरा. आणि घाल डोक्यात. त्या दिवशी मी तो कळ्यांचा गजरा घातला खरा..पण मनातून खूप वाईट वाटत होतं.

मोगरा, मदनबाण, जाई, जुई या फुलांच्या कळ्यांचा जरी गजरा घातला तरी त्या नंतर उमलणाऱ्या असतात. मला मे महिन्यात मिळणाऱ्या मदन बाणाचा गजरा सगळ्यात आवडतो. एकदा कामाच्या ठिकाणी संध्याकाळी मी मदनबाणाचा गजरा लावला होता. एक आजोबा काही कामासाठी आले. काम झाल्यावर जाता जाता मला म्हणाले , तुमच्या गजऱ्याचा सुंदर वास येतोय. कसला गजरा आहे हा..मी माझ्या भाच्यांसाठी न्यावं म्हणतोय. मी नाव सांगितलं. दुसऱ्याच दिवशी ते परत आले. त्यांनी मला एका पानाची गुंडाळी दिली. त्यात मदनबाणाच्या उमलू पहाणार्या फुलांचा गजरा होता. या काळ्या पूर्ण उमलल्या शिवाय याचा वास येत नाही. पण एकदा का या काळ्या उमलल्या तर याच्या सुंदर वासाने सारा आसमंत सुगंधित करून टाकतो. काय सुरेख निर्मिती आहे ही सृष्टीची.

तेच गोष्ट चमेली, जाई, जुई मोगर्याची. सकाळी न्हाऊन केसांची छानशी  बट वेणी घालावी. त्यावर एखादा सुंदर, मनमोहक वासाचा गजरा घालायचा. केस जरा ओले असतील तर छानच. छान अशाकरता की ओलेत्या केसांवर या फुलांचा वास खूप वेळ टिकून रहातो. आपल्या अवती भवती असणाऱ्यांना हा मंद सुवास विशेष जाणवतो. मला उग्र वासाचा सुरंगीचा गजरा फारसा आवडत नाही. बकुळीचा वासही तसा उग्रच. पण तरीही आवडणारा. पण हल्ली बकुळीचं झाडं बघायलाही महाग झालंय. अबोलीचा गजरा मला बघायला आवडतो. अबोलीच्या फुलांचा रंग मला प्रसन्नतेचं प्रतिक वाटतो.

लहान असताना एकदा कोणत्यातरी सिनेमात एका दृश्यात एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एक बाई आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मनगटाला गजरा बांधून करत होती. त्यानंतर मी सहजच मनगटाला गजरा बांधला. आणि आईच्या माराला सामोरी गेले. मला मी मार का खाल्ला याचा प्रश्न पुढे बरेच वर्ष पडत होता पण उत्तर मिळत नव्हतं.

एकदा एका कार्यक्रमात विद्या बाळ प्रमुख पाहुण्या होत्या. आम्ही सगळ्या जणींनी मोगर्याचा गजरा लावला होता. एक गजरा उरला होता. सहजच मी त्यांना तो दिला. सोबत पीनही दिली. त्यांनी पिन परत केली. मला वाटलं की त्या तो गजरा केसाच्या एका बटेत अडकवतील. थोड्यावेळाने बघितलं तर त्यांनी तो गजरा लहान मुलांना रुमाल लावतात तसा डाव्या बाजूला गोल करून लावला होता. मला ही गजरा लावण्याची कल्पना आवड्लीच. मी त्यांना तसं म्हणालेही. त्या म्हणाल्या की अगं इतका सुंदर वास असलेल्या गजरा आहे तर मला नको का वास यायला. आता इथे मी हा लावल्यामुळे मी त्याचा वास घेण्याचा आनंद उपभोगू शकतेय. काय बरोबर ना...त्या जे म्हणाल्या ते मला पटलं. पण तसा गजरा लावण्याचं माझं अजून तरी काही धारिष्ट्य झालेलं नाही.

 

 

No comments:

Post a Comment